मुंबई : मैत्रिणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अनिकेत चौधरी नामक तरुणाला अटक केली असून, त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे.
पीडित तरुणी मालाडच्या एका महाविद्यालयात शिकते. चौधरी याने तिचा फोटो काढला होता. हाच फोटो अश्लील स्वरूपात त्याने एडिट करत विविध सोशल साइटवर टाकला. त्यासाठी त्याने तिचे सात बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइल तयार केले. त्यावर त्याने अश्लील मेसेजही पोस्ट केले. ही बाब तिच्या एका मित्राने पाहिले आणि तिला याबाबत कळविले. तेव्हा तिने याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर सेलकडे मदत मागितली. सायबर सेलने तपास करत चौधरीला पकडून बोरिवली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याचा मोबाइल पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असून, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.