मुंबई : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत ‘फेसबुक’वर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. हा प्रकार करणाऱ्याविरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे पत्र परिमंडळ ११ च्या पोलीस उपायुक्तांना एका वकिलाने दिले आहे़ बोरीवली पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. एम. दहिकर यांची अॅड़ राजेश मोरे यांनी ४ जून, २०२० रोजी भेट घेत एक लेखी तक्रारपत्र दिले. मोरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी यांच्या फोटोसह काही आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. ही पोस्ट रिक्षा युनियनच्या सदस्याने केल्याचे समजते. त्यानुसार काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मोरे यांच्या मदतीने बदनामी करणारी पोस्ट टाकणाºयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. नामांकित पक्षाच्या महिला नेत्याबाबत अशी पोस्ट करणाºयावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार बोरीवली पोलीस ठाण्यासह मालाड आणि सायबर सेल पोलिसांकडेही ही प्रत देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करू, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांनी सांगितले.फडणवीस राजभवनात जास्त दिसतात!माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनात जास्त दिसतात, अशी पोस्ट टाकून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. ‘एक कोटी अजित पवार आणि सुप्रिया सुळे समर्थक’ नामक फेसबुक ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत मात्र फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनात जास्त दिसतात’ अशी पोस्ट सागर भिसे या तरुणाने टाकली. त्यावर त्याच्या अन्य मित्रांनी फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांची बदनामी करणाºया आणि धमकी देणाºया पोस्ट टाकल्या. या प्रकरणी एम. भारतीय नामक व्यक्तीने सांताक्रुझ पोलिसांना ई-मेलद्वारे पत्र दिले. त्यानुसार सांताक्रुझ पोलिसांनी या प्रकरणी ६ जून, २०२० रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.