मुंबई - गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांवर टीका केल्यानंतर त्याविरोधात भाजपा आणि शिंदे गट आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आता सावरकरांवरून ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने आल्याचे चित्र आहे. एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे नेते गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी भरसभेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना सुनावले. तसेच सावरकांचा अपमान सहन केला जाणार नाही, तुम्ही माझी उद्धव ठाकरेंकडे तक्रार करू शकता, असेही जाधव यांनी संभाजी ब्रिगेडला बजावले.
एका कार्यक्रमामध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे नेते एकत्र आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. आता कशालाही स्ट्रॅटर्जी म्हणण्याचा प्रकार आलेला आहे. हे स्ट्रॅटर्जीचं थोतांड आता आपल्याला संपवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा धर्मपरिवर्तन केलं तेव्हा सावरकरांनी एक लेख लिहिला बुद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांवर कठोर शब्दात टीका केली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेबाबत भास्कर जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सावरकरांबाबत बोलू शकतात. तो त्यांचा अधिकार होता. मात्र तो अधिकार तुम्हाला आणि आम्हाला असू शकत नाही. म्हणून तुमची आणि आमची युती असली तरी काही गोष्टींचं भान तुम्हाला आणि आम्हाला ठेवावं लागेल. एकमेकांच्या भावनांच आदर हा करावाच लागेल. तुम्ही माझी तक्रार उद्धव ठाकरेंकडे करू शकता. माझी त्याबाबत तक्रार नसेल. निर्णय त्यांचा असू शकतो. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अशा प्रकारचं वक्तव्य हे आमच्यासमोर भास्कर जाधवसारख्या कार्यकर्त्यासमोर होणं हे मला कदापिही सहन होण्यासारखं नाही, असा इशाराच भास्कर जाधव यांनी दिला.