मुंबई : तरुणीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार मालाडमध्ये गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी कुरार पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
कैलाश भाले (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मालाडच्या क्रांतिनगरमध्ये राहणाऱ्या भालेची दीड वर्षांपासून २२ वर्षीय पीडितेशी मैत्री होती. एक दिवस नातेवाइकांना भेटविण्याचा बहाणा करत क्रांतिनगरच्या घरी तो मुलीला घेऊन आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याचे फोटो आणि व्हिडिओ त्याने शूट करत त्यानंतर तिला सतत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये सहा महिने तो लातूरला गेला मात्र तिथून परतल्यावर एका रुग्णालयात काम करू लागला. यादरम्यान त्याने वारंवार पीडितेला बोलवून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा तिचा आरोप असून, तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कुरार पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.