३६२ कोटींच्या प्लाॅटवर ‘ईडी’चे ‘बीकेसी’त होणार कार्यालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 01:37 PM2024-01-31T13:37:46+5:302024-01-31T13:37:50+5:30

अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमुळे बिझनेस हब अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लवकरच ‘ईडी’चे (सक्तवसुली संचालनालय) कार्यालय तयार होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड ‘ईडी’ला देण्यात येणार आहे.

Office of 'ED' will be built in 'BKC' on a plot worth 362 crores | ३६२ कोटींच्या प्लाॅटवर ‘ईडी’चे ‘बीकेसी’त होणार कार्यालय

३६२ कोटींच्या प्लाॅटवर ‘ईडी’चे ‘बीकेसी’त होणार कार्यालय

मुंबई  - अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यालयांमुळे बिझनेस हब अशी ओळख निर्माण झालेल्या मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे लवकरच ‘ईडी’चे (सक्तवसुली संचालनालय) कार्यालय तयार होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’च्या अखत्यारीतील अर्धा एकर भूखंड ‘ईडी’ला देण्यात येणार आहे. यासाठी ३ लाख ४० हजार रुपये प्रतिचौरस मीटर दर आकारणी करण्यात येणार आहे. या नव्या जागेसाठी ‘ईडी’ला ३६२ कोटी रुपये खर्चावे लागणार आहेत.

आजच्या घडीला मुंबईत ‘ईडी’ची दोन कार्यालये आहेत. यापैकी दोन कार्यालये दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथे आहेत. यापैकी एका कार्यालयातून मुंबई परिसरातील प्रकरणांचा तपास केला जातो, तर दुसऱ्या कार्यालयाचा वापर हा रेकॉर्ड रूम म्हणून केला जातो.

 वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमध्ये ‘ईडी-२’चे कार्यालय आहे. येथून मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास केला जातो. 
 या तीनही कार्यालयांच्या इमारतीमध्ये अन्य खासगी कंपन्यांची देखील कार्यालये आहेत. त्यामुळे सुरक्षा व गोपनीयतेचा प्रश्न आजवर कायमच चर्चेत राहिला होता. 
 ईडी कार्यालयाला स्वतंत्र कार्यालयासाठी जागा मिळावी म्हणून एप्रिल २०२२ मध्ये ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ‘एमएमआरडीए’ला पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत प्राधिकरणाने मे, २०२३ मध्ये ‘ईडी’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 
 

८० वर्षांच्या भाडे करारावर जागा 
संबंधित जागा ‘ईडी’ला मार्केट दरानेच देण्यात आली असून, या जागेसाठी ‘ईडी’ने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत ३० टक्के रकमेचा भरणा करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप तो झालेला नाही. त्यामुळे आता एप्रिल २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. ही जागा ८० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात येणार आहे. या जागेवर कार्यालय पूर्ण झाल्यावर ‘ईडी’ची दोन्ही कार्यालये व रेकॉर्ड रूम एकत्र येऊ शकेल. त्यामुळे कामात सुलभता येणार आहे.

Web Title: Office of 'ED' will be built in 'BKC' on a plot worth 362 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.