अधिकारी आॅन ‘फोन’ २४ तास, फोन सुरू न ठेवल्यास संपर्क भत्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:29 AM2018-02-05T03:29:48+5:302018-02-05T03:30:40+5:30
बहुतांशी सरकारी आणि खासगी कार्यालयात फोन न वापरण्याच्या सूचना देण्यात येतात. फोनमुळे कामात लक्ष लागत नसल्याने मोबाईल फोनचा मर्यादित वापरचा सल्ला सर्रास दिला जातो.
महेश चेमटे
मुंबई : बहुतांशी सरकारी आणि खासगी कार्यालयात फोन न वापरण्याच्या सूचना देण्यात येतात. फोनमुळे कामात लक्ष लागत नसल्याने मोबाईल फोनचा मर्यादित वापरचा सल्ला सर्रास दिला जातो. मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) कायम सुरु ठेवा, या आशयाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर ज्या वरिष्ठ अधिका-यांचे फोन बंद असल्याचे आढळून येतील त्या वरिष्ठांचा संबंधित महिन्यांचा थेट संपर्क भत्ताच बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. यामुळे एसटी महामंडळातील अधिका-यांना ‘आॅफ’ ड्यूटीतही २४ तास फोन ‘आॅन’ ठेवावा लागणार आहे.
कर्मचा-यांना अनेकदा वरिष्ठांशी संपर्क साधावा लागतो. काहीवेळा वरिष्ठ अधिका-यांचा मोबाईल फोन बंद असतो. त्यामुळे कनिष्ठांकडून निर्णय घेण्यात येतो. निर्णय अयोग्य ठरल्यास त्याचे खापरही कनिष्ठ कर्मचा-यांच्या माथ्यावर फोडण्यात येते. या बाबत अनेक तक्रारी मुंबई मुख्यालयात प्राप्त झाल्या आहेत.
महामंडळाने या पूर्वी ही वरिष्ठ अधिका-यांना मोबाईल फोन सूरु ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. अखेर या सूचनेच्या गांर्भीयाने दखल घेण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी विशेष परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार ज्या वरिष्ठ अधिका-यांचा मोबाईल फोन सुरु नसल्याचे आढळल्यास त्या महिन्याचा संपर्क भत्ताच बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
>एसटी बिघडली कॉल सेंटरला कळवा
एसटी महामंडळाने टोल फ्री क्रमांकाचे कॉल सेंटर सुरु केले आहे. या कॉल सेंटरमधून एसटीचे वेळापत्रकाची माहिती मिळते. त्याच बरोबर प्रवाशांना ही तक्रारी आणि सूचना कॉल सेंटरच्या माध्यमाने देता येते. महामंडळाने ३ फेब्रुवारी काढलेल्या परिपत्रकानुसार मार्गस्थ बिघाडाची माहिती थेट कॉलसेंटरला कळवावी, कॉल सेंटरमधील प्रतिनिधी संबंधित विभागांना आणि आगारांना एसटी बिघाडाची माहिती देतील. यामुळे राज्यात कोठेही एसटी बिघडली की त्वरीत चालक वाहकांनी कॉल सेंटरला कळवावे.