इमारती कोसळल्यास अधिकारी जबाबदार!
By admin | Published: May 24, 2015 11:01 PM2015-05-24T23:01:34+5:302015-05-24T23:01:34+5:30
कल्याण डोंबिवली शहरात असलेल्या अतिधोकादायक इमारतींवर प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी तातडीने कारवाई करावी, पावसाळ्यात अतिधोकादायक इमारत कोसळल्यास
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात असलेल्या अतिधोकादायक इमारतींवर प्रभाग क्षेत्र अधिका-यांनी तातडीने कारवाई करावी, पावसाळ्यात अतिधोकादायक इमारत कोसळल्यास प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांबाबत विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली.
या बैठकीसाठी सर्व विभाग, प्रभाग, खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी शहरात सुरू असलेली रस्त्यांची कामे ३० मेपर्यंत तसेच नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबधित खातेप्रमुखांना दिले.
पावसाळ्यात तुंबणा-या चेम्बर्ससाठी जेटिंग वाहनावर सक्शन पम्प बसवावेत, अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या कराव्यात, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये, म्हणून महापालिका हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रात औषधांचा मुबलक साठा करावा असे आदेश संबधित विभागाच्या आधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीदरम्यान ज्या प्रभागात पाहणी दौरे केले जातात त्या प्रभागात संबंधित अभियंते-अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.