परमबीर सिंग यांच्या मर्जीतील अधिकारी रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:47+5:302021-05-09T04:06:47+5:30
गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडून तपास सुरू; सरकारकडून लवकरच कारवाईचा बडगा जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खात्याचे मंत्री व वरिष्ठ ...
गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडून तपास सुरू; सरकारकडून लवकरच कारवाईचा बडगा
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खात्याचे मंत्री व वरिष्ठ सहकाऱ्यावर आरोप करून खळबळ उडवून दिलेल्या मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांचे खात्यातील हस्तक, मर्जीतील अधिकारीही आता सरकारच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याशी संगनमताने केलेले गैरव्यवहार, बेकायदेशीर कारवाईबाबतची माहिती वरिष्ठ स्तरावरून घेतली जात आहे. संबंधितांविरुद्ध लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, या परमबीर सिंग यांच्या २० फेब्रुवारीच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर राज्य सरकारसह पोलीस वर्तुळात उलथापालथ झाली. त्यांनी पदाचा गैरवापर करीत केलेल्या बेकायदा कृत्याचा छडा लावण्याचे ठरविले आहे.
एकीकडे त्यांच्याविरुद्ध तक्रारीची प्रकरणे वाढत असतानाच खात्यातील त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सिंग हे गेल्या काही वर्षांत ज्या ज्या ठिकाणी कार्यरत होते, तेथील त्यांच्या मर्जीतील व मोक्याच्या पदावर कार्यरत असलेल्यांची माहिती घेतली जात आहे. त्यांनी केलेल्या बदल्या, महत्त्वाचे तपास, चौकशी, त्यांच्याविरुद्धच्या तक्रारी व अन्य प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना सर्व घटक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्याचा आढावा घेऊन संबधित अधिकाऱ्यांचा जबाब घेतला जाईल, आवश्यक त्या प्रकरणाची नव्याने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे गृह विभागातील सूत्रांनी सांगितलेे.
* मुंबई, ठाणे, एसीबीतील अधिकाऱ्यांकडून घेणार माहिती
सध्या होमगार्डचे महासमादेशक असलेल्या परमबीर सिंग यांनी मुंबई, ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), दहशतवादविराेधी पथक (एटीएस) आदी ठिकाणी अनेक वर्षे काम केले आहे. तेथील प्रमुखांकडून माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, त्यांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
.....................