Join us  

स्थायी समितीवर अधिकाऱ्यांचा बहिष्कार!

By admin | Published: June 19, 2014 1:55 AM

महापालिका आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे अधिकारी व कर्मचारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई : महापालिका आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी असंसदीय शब्द वापरल्यामुळे अधिकारी व कर्मचारी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आयुक्तांची माफी मागितली नाही तर स्थायी समितीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. महापालिकेच्या १२ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिवसेना सदस्य विठ्ठल मोरे व आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली होती. विकासकामे होत नसल्यामुळे आयुक्तांच्या हाताला लकवा भरला का अशी टीका केल्यामुळे प्रशासनाने सभेवर बहिष्कार टाकला होता. या प्रकरणावरून आता महापालिका अधिकारी असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्तांचा अशाप्रकारे अपमान केल्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत आयुक्तांची माफी मागितली जात नाही तोपर्यंत सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभांमध्ये अनेक वेळा अधिकाऱ्यांना धारेवर धरताना चुकीचे शब्द वापरले जातात. या घटना पुन्हा होवू नये अशी मागणी संघटनेने केली आहे.सभांमध्ये संसदीय शब्दांचाच वापर झाला पाहिजे असे मत संघटनेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर व कार्याध्यक्ष रमाकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)