Join us

कंट्रोल रूममधील अधिकारी प्रवाशांशी साधणार थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 1:52 AM

पश्चिम मार्गावर मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन सेवा 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :भारतीय रेल्वेमध्ये सर्वात प्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा सुरु झाली आहे. यामुळे तांत्रिक बिघाड झाल्यास, मान्सून काळात लोकल सेवा ठप्प झाल्यास लोकल सेवा कधी सुरू होईल, लोकलच्या वेळापत्रकातील बदलांची माहिती मिळणार आहे. मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन या यंत्रणेचे उद्घाटन महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. 

यावेळी आलोक कंसल म्हणाले की, भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच  एमटीआरसी सुविधा तयार करण्यात आली आहे. लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास एमटीआरसी यंत्रणेद्वारे कंट्रोल रूममधील अधिकारी थेट लोकलमधील प्रवाशांशी संपर्क साधू शकतात. यासह गार्ड प्रवाशांशी, कंट्रोल रूममधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतो. मान्सून काळात लोकल विस्कळीत झाल्यास ‘एमटीआरसी’ने लोकलचे ठिकाण, लोकलची सेवा कधी सुरु होईल, याची माहिती मिळेल.मेट्रो आणि मोनो कंट्रोलच्याधर्तीवर पश्चिम रेल्वे मार्गावर ‘एमटीआरसी’ची यंत्रणा बसविण्यात आली आहे. एमटीआरसी यंत्रणेमुळे कंट्रोल रूम आणि प्रत्येकप्रवाशामध्ये संवाद समन्वय साधण्यात मदत होईल.

पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमटीआरसी यंत्रणा सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. रेल्वे रुळाला तडा गेला, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यास लोकल सेवेचे तीनतेरा वाजतात. त्यानंतर लोकल सेवा कधी सुरू होईल, याची माहिती रेल्वे प्रवाशांना मिळत नाही. परिणामी, प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एमटीआरसी यंत्रणा बसविण्यात आली आहे. लोकलचा तांत्रिक बिघाड किंवा रेल्वेचा खोळंबा झाल्यास प्रवाशांना लोकलच्या वेळापत्रकात झालेल्या बदलाची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. उपनगरीय लोकल ज्यावेळी रेल्वे मार्गावर धावते, त्यावेळी मोटरमनचे मोबाईल बंद असतात. त्यामुळे जेव्हा लोकल बंद पडतील किंवा कोणती घटना घडली की, त्यावेळी मोटरमन कर्मचाऱ्यांना मोबाईल सुरू करू कंट्रोल रूमशी संवाद साधावा लागतो. त्यामुळे मोठा वेळ जातो. ही अडचण दूर करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता पश्चिम रेल्वेने आपल्या प्रत्येक लोकलमध्ये एमटीआरसी यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण एक हजार ३६७ लोकल फेऱ्या धावतात. सध्या एक हजार ३०० फेऱ्या धावत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरून दर तीन मिनिटाला एक लोकल फेरी होते. पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ९८ टक्के वक्तशीरपणा आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, फाटकामुळे २ टक्के लोकल उशिराने धावतात. काहीवेळा तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत होते. अशावेळी लोकलमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहिती देण्यासाठी ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.