सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून कांदिवलीत महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 05:15 AM2018-07-04T05:15:00+5:302018-07-04T05:15:00+5:30
कांदिवलीतील शिवसेना उपविभागप्रमुखाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळणाºया एका महिलेने केला आहे. पाच वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवातील एका कार्यक्रमाच्या संयोजनाचे बिल त्याने दिले नसून, आपल्यावर अन्याय झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्या महिलेने दिला आहे.
मुंबई : कांदिवलीतील शिवसेना उपविभागप्रमुखाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळणाºया एका महिलेने केला आहे. पाच वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवातील एका कार्यक्रमाच्या संयोजनाचे बिल त्याने दिले नसून, आपल्यावर अन्याय झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा त्या महिलेने दिला आहे.
सीमा अमरे असे पीडित महिलेचे नाव असून, ती एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळते. सीमा हिने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये कांदिवली (प.) महावीरनगरमधील कदमवाडी मैदानात नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम झाला होता. त्याच्या संयोजनाची जबाबदारी शिवसेनेचे उपविभागप्रमुख विजय भोसले यांनी अमरे यांच्यावर सोपवली होती. त्याबदल्यात लाख रुपये देण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, भोसले यांनी आजतागायत आपल्याला रक्कम दिलेली नाही. वारंवार मागणी करूनही ते टाळाटाळ करीत आहेत.
‘गेली पाच वर्षे मी भोसले यांच्या कार्यालयात हेलपाटे घालत होती. मात्र, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढला असून, मी सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाºयांना भेटून ही व्यथा मांडली आहे. मात्र, अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आपल्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,’ असे तिने एका पत्राद्वारे पोलिसांना कळविले.
फसवणुकीप्रकरणी लेखी तक्रार आम्हाला अमरे यांच्याकडून मिळाली आहे. त्यानुसार उपलब्ध कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- प्रदीप धावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चारकोप पोलीस ठाणे
कार्यक्रमासाठी लाखो रुपयांची जाहिरात मिळवून देण्याचे अमरे यांनी कबूल केले होते. मात्र, त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे आम्हाला स्वखर्चाने हा कार्यक्रम करावा लागला. तसेच त्यांचा भोजने नामक साथीदार आमच्या घरी चोरी करून पसार झाला. त्या घटनेनंतर अमरेदेखील कधीच समोर आल्या नाहीत. पाच वर्षांनंतर त्या आमच्यावर का आरोप करत आहेत, हे आम्हाला समजलेले नाही. हे राजकीय कटकारस्थान असून आम्ही या प्रकरणी संबंधितांवर मानहानीचा दावा दाखल करणार आहोत.
- विजय भोसले, शिवसेना उपविभागप्रमुख, कांदिवली