मुंबई : मराठी अभ्यास केंद्राच्या ‘माझा प्रभाग-माझा नगरसेवक’ या प्रकल्पांतर्गत मुंबई शहर-उपनगरांतील नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याचा प्रकल्प सुरू आहे. मात्र या प्रकल्पावर कार्यरत मराठी अभ्यास केंद्राच्या सदस्यांची अडवणूक करून गोवंडीतील नगरसेवकांना वाचविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांची धडपड सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘माझा प्रभाग - माझा नगरसेवक’ या प्रकल्पात माहितीचा अधिकार वापरून नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन केले जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास ४० नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक जानेवारी २०१७च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणार आहे. यासाठी गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३७, १३८ आणि १३९च्या नगरसेवकांच्या वर्षनिहाय कामांबाबत निधी आणि निधीच्या खर्चाबाबत, खरेदीबाबतच्या तपशीलासाठी परिरक्षण विभागात ५ आॅक्टोबर रोजी माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाला अडीच महिने उलटूनही पालिकेचे अधिकारी माहिती देत नसल्याचे अर्जदार नीलेश शिंदे यांनी सांगितले.गोवंडीमधील प्रभाग क्रमांक १३७, १३८ आणि १३९ येथील नगरसेवकांविषयी प्रभाग समितीची माहिती, पालिका मुख्यालयातील उपस्थिती, विचारलेले प्रश्न, विशेष सभांमधील उपस्थिती याविषयी माहिती मिळाली आहे. मुंबई शहर-उपनगरांतील नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापनही अंतिम टप्प्यात आहे. मात्र केवळ एम पूर्व विभागातील विभाग अधिकारी श्रीनिवास किलजे, जनमाहिती अधिकारी संदीप वाघ, वरिष्ठ जनमाहिती अधिकारी कोठारी, सहायक अभियंता जयस्वाल, कनिष्ठ अभियंता तांबे व इशी, तक्रार निवारण अधिकारी सावंत हे अधिकारी माहिती अधिकाराच्या अर्जाची पूर्तता करत नसल्याचे शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)
नगरसेवकांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड?
By admin | Published: December 23, 2016 3:53 AM