Join us

अतिक्रमण पाहणीकडे अधिकाऱ्यांची पाठ; नागरिकांमध्ये पसरला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 10:59 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून हे अतिक्रमण पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील  चारकोप खाडी परिसरात करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदळवनाची कत्तल करून चारकोप खाडीनजिक झालेल्या अतिक्रमणाबाबत गुरुवारी झालेल्या पाहणीकडे महापालिका तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून हे अतिक्रमण पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील  चारकोप खाडी परिसरात करण्यात आले आहे. नॉन डेव्हलपमेंट विभागात म्हाडाच्या तसेच खासगी जागेतील कांदळवन उद्ध्वस्त करून भूमाफियांनी भरणी करत तेथे हे गाळे आणि कार्यालय उभारल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल ॲन्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी महापालिका, पोलिस, महसूल, वन खात्याचा खारफुटी विभाग, तसेच महाराष्ट्र सागरी नियंत्रण व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केली होती. त्यासोबत २००५ ते २०२२ या कालावधीतील सॅटेलाइट मॅपवरील छायाचित्रांचे पुरावेही सादर केले होते. 

या तक्रारीनुसार २४ एप्रिल रोजी या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा घटनास्थळी पाहणी केली. वन खात्याच्या कांदळवन विभागाने या कत्तलीची दखल घेत याबाबत तहसील कार्यालयाला कारवाई करण्याचे कळवले होते. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी बांधकाम करणाऱ्यांना एमआरटीपीची नोटीस बजावली.

तहसील कार्यालयाने यासंदर्भात १७ मे रोजी दुसरी पाहणी ठेवून त्यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानुसार सिटी सर्व्हे, बोरीवली तहसील कार्यालय आणि वन विभागाच्या कांदळवन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, अतिक्रमणाचे प्रकरण असताना आणि आगाऊ कळवलेले असतानाही  आर मध्य विभागाचा तसेच उपजिल्हाधिकारी  कार्यालयाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही.

कारवाई का नाही?कांदळवनाची कत्तल करून झालेली भरणी आणि अनधिकृत बांधकाम याबाबत तातडीने कारवाई हाेणे अपेक्षित असताना भूमाफियांना वाचवण्यासाठी काही विभागांचे अधिकारी पाठ फिरवत नाहीत ना, असा प्रश्न रेजी अब्राहम यांनी उपस्थित केला आहे.