मुंबई : कोरोना साथीमुळे सध्या बंद असलेली मुंबईतील सर्व कार्यालये तसेच लोकल आदी सेवा येत्या १ नोव्हेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील, असे मत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेने यासंदर्भात केलेल्या अभ्यासातून व्यक्त केले आहे. या अभ्यासाचा अहवाल टीआयएफआरने मुंबई महानगरपालिकेला सादर केला आहे.
स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सचे डीन संदीप जुनेजा यांनी प्रल्हाद हर्ष आणि रामप्रसाद सप्तऋषी यांच्या सहकार्याने हा अभ्यास केला. त्याच्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा १ जानेवारीपासून पुन्हा सुरू करता येतील.
मुंबई शहरातील कार्यालयांमध्ये सप्टेंबर महिन्यात एकूण कर्मचारी वर्गापैकी ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करायला हवी. वाहतूक व्यवस्थेतील एकूण क्षमतेच्या तुलनेत फक्त ३० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात यावी. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही क्षमता ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी सर्व कार्यालये व वाहतूक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू करावी. मात्र हे करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नागरिकांनी काटेकोरपणे करावे, असेही या अहवालात म्हटले आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने सरकारने लोकल सेवा काही काळ बंद केली. त्यानंतर ही लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली. बेस्टच्या बसेसची वाहतूक सुरू असली तरी त्यामध्ये विशिष्ट प्रमाणातच प्रवासी घ्यावे, असे बंधन घालण्यात आले आहे.
दुसरी लाट मोठी असेल
मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्याच्या मध्याला कोरोना साथीची येणारी दुसरी लाट ही पहिल्यापेक्षा जास्त मोठी असेल. १ नोव्हेंबर रोजी कार्यालये, वाहतूक सेवा पूर्ववत सुरू केल्यानंतरच्या काळात मुंबईत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या व मरण पावणाºयांचे प्रमाण कमी झालेले असेल, अशी शक्यता टीआयएफआरच्या संशोधकांना वाटत आहे.