काळबादेवी आगीतील अधिकारी आता ‘शहीद’
By admin | Published: July 26, 2016 01:16 AM2016-07-26T01:16:11+5:302016-07-26T01:16:11+5:30
काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत बचावाचे काम करताना वीरमरण आलेले अग्निशमन दलातील अधिकारी सुनील नेसरीकर, सुधीर अमीन, संजय राणे, महेंद्र देसाई
मुंबई : काळबादेवी येथील गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या आगीत बचावाचे काम करताना वीरमरण आलेले अग्निशमन दलातील अधिकारी सुनील नेसरीकर, सुधीर अमीन, संजय राणे, महेंद्र देसाई यांना शहीद दर्जा प्रदान करण्यात आला आहे. नगर विकास विभागाने यासंदर्भातील अध्यादेश २२ जुलै रोजी काढला आहे.
९ मे २०१५ रोजी काळबादेवी येथील चार मजली गोकूळ निवास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या आगीत अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर, उपप्रमुख अधिकारी सुधीर अमीन, सहायक विभागीय अधिकारी संजय राणे आणि भायखळ्याचे केंद्र अधिकारी महेंद्र यांना वीरमरण आले होते. शासन निर्णयानुसार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करताना मृत अथवा जखमी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींच्या धर्तीवर महापालिकेच्या निधीतून सवलती आणि फायदे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
त्यानुसार, अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवासी जिल्ह्यात किंवा निवासी जिल्ह्याच्या ज्या महसूल विभागात समावेश होतो; त्या महसूल विभागातील त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी एक सदनिका विनामूल्य, ज्या ठिकाणी म्हाडाची योजना असेल तेथे त्या योजनेअंतर्गत एक सदनिका देण्यात येणार आहे.
सदनिका उपलब्ध नसेल तर क्षेत्रफळानुसार प्रति चौरस फुटाला ३ हजार रुपये रोख रक्कम देण्यात येईल. शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेनुसार कुटुंबीयांपैकी एकाची महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यात येईल. २५ लाख सानुग्रह अनुदान कायदेशीर वारसदारांच्या संयुक्त नावाने मुदत ठेव म्हणून देण्यात येईल.
हा निधी १० वर्षांपर्यंत काढता येणार नाही. व्याज रक्कम दर महिन्याला देता येईल. शिवाय दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा, महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च करण्यात येईल. अधिकारी, कर्मचारी मृत झालेला नाही, असे मानून
त्या व्यक्तीला सेवेत असताना मिळणारे वेतन कुटुंबीयांना
देण्यात येईल. सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत हे वेतन देय राहणार आहे. (प्रतिनिधी)