Join us

नाराज शिंदे गटाचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम

By मनोहर कुंभेजकर | Published: August 10, 2023 4:58 PM

सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते.

मुंबई- शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव व शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून कांदिवली पूर्व विधानसभा, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे दिले होते. याबाबत कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या ४० नाराज पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काल दुपारी ४ वाजता वर्षा बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले होते. काल रात्री उशिरा सुमारे २५ मिनीटे या विषयावर आमची मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी संजय मशीलकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल मध्यरात्री भेटून विभाग २ कांदिवली,मालाड,चारकोप विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाच्या ४० पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले नाहीत. शिवसेना सचिव सिद्धेश रामदास कदम यांच्या नवनिर्वचित पदाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. तसेच आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका पाहता विभाग क्रमांक २ मध्ये  विभागप्रमुख हा मराठी चेहरा असावा अशी आग्रही मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या प्रकरणी २ दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले. मात्र आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या या मतांवर ठाम असल्याचे चारकोप विधानसभा प्रमुख संजय सावंत यांनी लोकमतला सांगितले.

संजय सावंत यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले की,  विभागत गटबाजी असून, प्रोटोकॉल पाळला जात नाही. पक्षाच्या कुठच्याही बैठका, मेळावे आणि पक्षात बळकटी करिता काही कामे विभागात होत नसल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले. कांदिवली पूर्व विधानसभा उपविभागप्रमुख विकास गुप्ता यांनी परस्पर नियुक्त्या करतांना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, कोणत्याही कार्यक्रमात बोलावलं जात नाही तसेच जातीविषयी रोष ठेवला जातो.  मालाड विधानसभा प्रमुख नागेश आपटे यांनी पक्षातील  अंतर्गत गटबाजीमुळे लोकांची कामे होत नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची गळचेपी होत आहे या मुद्द्यावर लक्ष वेधले.

महिला विधानसभा समन्वयक वृषाली ब्रम्हे यांनी पक्षातील महिला वरिष्ठ पदाधिकऱ्यांकडून महिलासोबत अर्वाच भाषेत बोलण्यात येते, अपशब्द वापरले जातात, महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.तसेच महिलांच्या चारित्र्यावर टीका केली जाते आणि दूजाभाव केला जातो. या चर्चे वेळी  प्रकाश सोळंकी,राजेंद्र सावंत,अँथोनी डिसोझा, राजेंद्र सिंग,प्रशांत कडू, विश्वास रेपे, महेंद्र शेडगे, राजेश यादव, नरेश बाने, सिद्धर्ध  जैयस्वल, विनोद यादव, संजय माने, सुमित कुंभार, दिलीप भरवाड, संजय तावडे, हितेश गिरी, गोम्स डिसुझा, पुरुष पदाधिकारी तसेच रेखा पटेल, मनिषा सावंत,प्रेशिला फर्नांडिस, क्षितीजा इंगवले, गोमती शेट्टी, यामिनी भोईर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :मुंबईरामदास कदमएकनाथ शिंदे