मुंबई पूरमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 07:03 AM2021-01-10T07:03:23+5:302021-01-10T07:03:47+5:30
निवडणुकांची पूर्वतयारी; पालिकेने तयार केला आराखडा
मुंबई : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा ‘पूरमुक्तमुंबई’चा नारा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही सत्तेत शिवसेनाच असल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेण्याचा दबाव पालिका प्रशासनावर आहे. त्यामुळे तुंबणाऱ्या पाण्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
राज्याचे पर्यावरणमंत्री व युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांचा आढावा गुरुवारी पालिका मुख्यालयात घेतला. या वेळी मुंबई पूरमुक्त करण्यासाठी कोणत्या उपाययोजना पालिकेने केल्या आहेत, याची झाडाझडती त्यांनी घेतली. गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक सखल भागांत पाणी तुंबले होते. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक कालावधी लागला होता. यावर मुंबईत पूरमुक्त बोगदे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पालिका निवडणुकीला अवघे एक वर्ष उरले असल्याने पूर बोगद्यासाठी वाट पाहण्याची वेळ शिवसेनेकडे नाही. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत म्हणजे जून २०२१ पर्यंत तात्पुरत्या पूरमुक्तीचा झटपट आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबतचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच पालिका अधिकारी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
१७१ ठिकाणे पूरमुक्त केल्याचा दावा
nगेल्या वर्षी महापालिकेने तयार केलेल्या यादीनुसार मुंबईतील ३८६ ठिकाणी पाणी तुंबते. यापैकी १७१ ठिकाणे पूरमुक्त करण्यात यश आल्याचा दावा अधिकारी करीत आहेत.
nपालिकेचे उपायुक्त संजय दराडे यांनी पूरमुक्तीचा आराखडा तयार केला आहे. त्यांनी सेवानिवृत्तीपूर्वी हा आराखडा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू यांना सादर केला आहे.
nऑगस्ट आणि सप्टेंबर २०२० मध्ये दक्षिण मुंबईत अनेक भागांमध्ये पहिल्यांदा पाणी तुंबले होते. या सर्व परिसरांचा अभ्यास करून १३९ या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.