सत्ताधाऱ्यांनी कामातून प्रचार करावा - टी.आर.के. सोमय्या
By admin | Published: January 26, 2017 03:53 AM2017-01-26T03:53:32+5:302017-01-26T03:53:32+5:30
भारताची राज्यघटना घटना समितीने, १९४९ साली २६ नोव्हेंबर रोजी स्वीकारली व १९५० रोजी २६ जानेवारीला अंमलात आली.
मुंबई : भारताची राज्यघटना घटना समितीने, १९४९ साली २६ नोव्हेंबर रोजी स्वीकारली व १९५० रोजी २६ जानेवारीला अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत तरुणपिढी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विसरतेय. या पार्श्वभूमीवर आणि सध्याच्या बदलत्या राजकीय प्रवाहांविषयी मुंबई सर्वोदय मंडळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि ज्येष्ठ गांधीवादी टी.आर.के. सोमय्या यांच्याशी केलेली ही बातचीत...
आताची तरुणपिढी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विसरत चाललीय का?
हो, कारण आपल्या अभ्यासक्रमातील नागरिकशास्त्र विषय केवळ मार्कांपुरता शिकतो आणि शिकविलाही जातो. त्यानंतर, त्याचा अवलंब तसा आपल्या आयुष्यात होत नाही. मात्र, यापूर्वीच्या पिढ्यांना प्रजासत्ताक दिनाची मूलभूत माहिती असायची. आता मात्र, आजच्या तरुणाईला प्रजासत्ताक दिनाचे महत्त्वच माहीत नसते. केवळ सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी २६ जानेवारीचा दिवस असतो, हे आजच्या पिढीचे वास्तव गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण हीच पिढी भविष्यात देश घडविणार आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीविषयी काय सांगाल?
सध्याचे सत्ताधारी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी चुका करत आहेत. सध्याचे नेते आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दल अनभिज्ञ असतात, शिवाय या राजकीय नेत्यांनी जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री असो वा महात्मा गांधी, यांचे योगदान केवळ भिंतीवरील छायाचित्रांएवढेच राहिले आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीसाठी गांधींच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचविला, हे गंभीर आहे.
सध्याच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल?
महात्मा गांधीजींनी ‘माय लाइफ इज माय मेसेज’ हा महत्त्वपूर्ण संदेश दिला. हा विचार आजच्या तरुणाईने अंगीकारल्यास समाजात नक्कीच बदल घडेल. गांधीजींनी शिकविलेल्या नैतिक मूल्यांचा विसर आजच्या राजकीय नेत्यांना पडला आहे. त्यामुळे मुख्यत: शालेय वयातील लहानग्यांनी आणि तरुणपिढीने ही मूल्ये जोपासण्यास सुरुवात केल्यास, समाज बदलांकडे वाटचाल करेल, हे निश्चित आहे. सर्वोदय मंडळाच्या वतीनेही ठिकठिकाणी तरुणांची शिबिरे घेतली जातात. इतकेच नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शाळा आणि महाविद्यालयांत ‘गांधी शांती परीक्षा’ घेतली जाते. केवळ विद्यार्थी नव्हे, तर महाराष्ट्रातल्या विविध कारागृहांत जाऊन अहिंसेचे धडे दिले जातात. नुसते धडेच नाहीत, तर त्यावर आधारित कैद्यांची परीक्षाही घेतली जाते. यातूनच अनेक कैदी चांगल्या मार्गाला लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.