लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेले मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम आता अंतिम टप्प्यात असून काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या आढाव्याचे कामदेखील संपत आले आहे. विशेषत: आता प्रकल्पस्थळाच्या पाहणीसदेखील वेग आला असून नुकतीच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आगामी ट्रायल रनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मेट्रो ७ वरील बाणडोंगरी स्थानकाला भेट दिली होती. दुसरीकडे मेट्रोच्या चाचणीचा दिवस जसजसा जवळ येतो आहे तसतसा बैठकांवर जोर दिला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील पायभूत सेवा सुविधांची कामे वेगाने सुरू असून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो मार्ग येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. २०१६ साली या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आहे. या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज आहे.