लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/लातूर : राज्यातील १६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयात चौथ्या फेरीनंतर शिल्लक जागांवर करण्यात आलेले ऑफलाइन प्रवेश रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन होत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.
एकूण चार फेऱ्या झाल्यानंतरही खासगी २२ महाविद्यालयांपैकी १६ महाविद्यालयांमध्ये जवळपास १४१ जागा शिल्लक होत्या. परंतु, काेर्टाच्या निर्देशाचे उल्लंघन झाल्याने प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत.
१४१ विद्यार्थ्यांचे काय? १४१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार आहेच. शिवाय, शिल्लक जागांवरील प्रवेश नेमके कसे होणार, हे कोडे कायम आहे. शिल्लक जागांवरही ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देता येणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी चर्चा व समन्वय साधून अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ देणार नाही, या पद्धतीने तोडगा काढण्यात येईल.- महेंद्र वारभुवन, आयुक्त, राज्य सामायिक कक्ष