ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज सादर करता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:09 AM2020-12-30T04:09:15+5:302020-12-30T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदारांना पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन अर्ज सादर करता येतील. राज्य निवडणूक आयुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदारांना पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन अर्ज सादर करता येतील. राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचे आदेश जारी केले. याशिवाय ३० डिसेंबरला सायंकाळपर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ वाढविण्यात आली आहे.
एप्रिल ते डिसेंबर, २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा आहे. त्यानुसार, आतापर्यंत एकूण ३ लाख ३२ हजार ८४४ अर्ज ऑनलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत. मात्र, सोमवारी सायंकाळपासून ऑनलाइन अर्ज दाखल करताना इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण अशा तांत्रिक अडचणीच्या तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. याची दखल घेत, इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी, म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने स्वीकारण्याचा, तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळही ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे मदान यांनी आदेशात म्हटले आहे.