आठवी ते बारावीचे ऑफलाइन वर्ग भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:18+5:302021-07-07T04:07:18+5:30
शालेय शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्याने कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील कोविडमुक्त ...
शालेय शिक्षण विभागाकडून टप्प्याटप्याने कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मान्यतेने ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, २ बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सत्रांच्या वेळा व महत्त्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन करणे, अशा नियमांचे पालन शाळांना करावे लागणार आहे. संबंधित शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर / रॅपिड अँटिजन चाचण्या कराव्या लागतील. या नियमांची अंमलबजावणी करून राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करता येणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र एसओपी (मार्गदर्शक सूचना) ही जारी केल्या आहेत.
दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोना होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, तर १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या कमी धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे कोविड मुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या पहिल्या टप्प्यात शाळांना गावकरी, पालकांसोबत ठराव करून घ्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची शाळांतील उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. शिवाय पूर्ण उपस्थितीसाठी शाळेकडून देण्यात येणारी पारितोषिकेही बंद करण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतःचे शैक्षणिक साहित्य स्वतःच आणणे आवश्यक असून त्याची अदलाबदल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी किंवा शिक्षकेतर कर्मचारी कोरोना संशयित आढळल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करून राज्य मदत कक्षाला सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यपकाच्या मोबाइलमध्ये ही माहिती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणावर भर
शाळेमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असून पालकांनी शक्यतो स्वतःच्या खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, सार्वजनिक वाहनांचा वापर टाळावा, अशा सूचनाही एसओपीमध्ये आहेत. रोज २ सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गांचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित केल्यास विद्यार्थ्यांची गर्दी टाळता येणार आहे.