Join us

ऑफलाईन परीक्षांचा पालकांना धसका ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येत असलेल्या दहावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे यासंदर्भात सुरू असलेल्या अफवांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पालकांची चिंता वाढली आहे. ऑफलाईन परीक्षांच्या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षिततेचे नियम कसे पाळले जाणार ? परीक्षांच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याने व कालावधी ३ तासांचा असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्या ऑनलाईन घेतल्या जातील, अशी अफवा सोशल मीडियावर सुरू असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

ऑनलाईन परीक्षांचा पर्याय योग्य

मार्च २०२०मध्ये लॉकडाऊननंतर विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने परीक्षा ऑनलाईनच घ्यायला हव्या होत्या, असे मत ६८.३ % विद्यार्थ्यांनी एका सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत केवळ २१ % विद्यार्थ्यांनी ४० ते ५० टक्के स्वतःचा असा अभ्यास झाला असल्याचे कबूल केले आहे. शिक्षण विभागाने नियमित विद्यार्थ्यांसाठी यंदा शालेय अभ्यासक्रमात २५ % कपात केली आहे. त्या अभ्यासक्रम कपातीच्या संदर्भात अद्याप ५१ % विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सध्याच्या प्रचलित परीक्षेपेक्षा आराखडा बदलून ५० % गुण बोर्डाने शाळेतील अंतर्गत मूल्यमापन, तर ५०% लेखी परीक्षेस ठेवावे, असे मत तब्बल ८२.८ % विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

....

परीक्षेचे वेळापत्रक

दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे

बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे

बारावीतील पालकांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घ्यायची मंडळाने तयारी करायला हवी. मात्र, एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घ्यायला गुणांचे नियोजन करणे अवघड होणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा मंडळाने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पद्धतीवर विचार करायलाच हवा.

सुवर्णा कळंबे, पालक

---------

विद्यार्थ्यांच्या अकाऊन्टस , गणित यांसारख्या विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे अवघड जाणार आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीत, गुण पद्धतीत मंडळाने बदल करण्याचा विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने आयोजन करावे.

विनोद राठोड, पालक

----------

राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने राज्य परीक्षा मंडळाने परीक्षांचे आयोजन करताना गुण विभागणी ५० टक्के शाळांकडे, ५० टक्के ऑफलाईन परीक्षा यामार्फत करायला हरकत नाही. यापेक्षा सहज सोपा इतर पर्याय असेल तर त्याचाही विचार करायला हवा.

मान्यता सावंत, पालक

----------

दहावीतील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केला आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना कोरोनाचा प्रादुर्भाव, विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय, त्यांची सुरक्षितता या साऱ्याचा विचार करून नियोजन करायला हवे. कोरोना प्रादुर्भावाच्या मानसिक तणावाखाली असताना विद्यार्थी, पालक या दोघांचाही विचार करायला हवा.

प्रथमेश शिर्के, पालक

-----

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांसह आम्हीही प्रचंड तणावात आहोत. शाळा सुरू नसल्याने आपण इतरांच्या तुलनेत कमी गुण मिळवू, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय निवडायला हवा.

शीतल आंब्रे, पालक

--------

ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा ६० टक्केच अभ्यास झाला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वंकष विचार करून मंडळाने मूल्यमापनाची पद्धत अवलंबायला हवी. याच अभ्यासाच्या आधारावर मंडळाने प्रचलित पद्धतीचा हट्ट न धरता परीक्षेचे नियोजन करावे, अशीच आमची मागणी आहे.

सुनीता चौधरी, पालक

-------