'ऑफलाइन' लसीकरणाच्या 'टोकन'ची व्हॉट्सॲपवरच होते बुकिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:45+5:302021-07-20T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: पालिका लसीकरण केंद्रावर 'ऑफलाइन' लसीकरणासाठी दिली जाणारी 'टोकन' स्थानिक नगरसेवकाचे नातेवाईक आणि कार्यकर्ते 'व्हॉट्सॲॅप' वरच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पालिका लसीकरण केंद्रावर 'ऑफलाइन' लसीकरणासाठी दिली जाणारी 'टोकन' स्थानिक नगरसेवकाचे नातेवाईक आणि कार्यकर्ते 'व्हॉट्सॲॅप' वरच बुक करत असल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत' च्या हाती लागली आहे. बोगस लसीकरण प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या कांदिवलीच्या आर दक्षिण विभागात मोडणाऱ्या वॉर्ड क्रमांक २६ मधील संतमंत अनुयायी आश्रममध्ये हा प्रकार घडत आहे. ज्यात पालिकेने नियुक्त केलेला कंत्राटी डॉक्टर त्यांना मदत करत असल्याचीही माहिती आहे. परिणामी 'लस मिळेल' या आशेने रांगेत तासनतास उभे राहून पायपीट करणाऱ्या स्थानिकांनी आता या केंद्राकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली असून, पालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ज्यात तथ्य नसल्याचे स्थानिक नगरसेविकेचे म्हणणे आहे.
कांदिवलीतील सिंग इस्टेट येथे हे केंद्र ४ जून, २०२१ रोजी स्थानिक नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले. स्थानिकांना सोयीचे पडेल अशा ठिकाणी हे केंद्र असल्याने अधिकाधिक गरिबांना याचा लाभ सहज घेता येऊ शकतो. मात्र त्यांना डावलत पंडागळे यांचे नातेवाईक आणि काही कार्यकर्ते हे व्हॉट्सॲपवरच 'ऑफलाइन' लसीकरणासाठी दिलेल्या लसीचे कुपन कंत्राटी डॉक्टरकडून मागून घेतात, तर कधी डॉक्टरच कोणाला किती कूपन पाहिजे? याबाबत विचारतो. पालिकेकडून प्रत्येक केंद्रावर किती लसी उपलब्ध केल्या जाणार याची माहिती एक दिवस आधीच पुरवली जाते.
त्यानुसार सदर डॉक्टर हा नगरसेवकाचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना किती कुपन हवे याबाबत यादी मागून घेतो. त्यामुळे प्रत्यक्षात जे लोक सकाळी पायपीट करत कूपन घेण्यासाठी जातात त्यांना ते मिळतच नाही असे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे. पालिकेकडून 'ऑनलाइन' आणि 'ऑफलाइन' या दोन पद्धतीने लसीकरण करण्यात येत आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार सकाळीच कूपनचे वाटप करत लसीकरण केंद्रावर गर्दी नको म्हणून कूपनधाऱ्यांना स्लोटची वेळ सांगितली जाते. त्यावेळेनुसार ते येऊन लसीकरण करून जातात असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कूपन असलेल्या व्यक्तीलाच लस दिली जाते.
मात्र संतमंत अनुयायी आश्रमात तासनतास उभे राहून कूपनसाठीच नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. बऱ्याचदा कूपन संपली असे सांगत त्यांना परत पाठवले जाते. मात्र याविरोधात पुढे येऊन तक्रार करण्यास कोणीही धजावत नसल्याने आता राजरोसपणे हा प्रकार सुरू असून, नगरसेवकाला लसीचा कोटा मिळतो, असा नागरिकांचा समज आहे.
नगरसेवकाला 'कोटा' नाही !
प्रत्येक वॉर्डमधील नगरसेवकाला लसीचा कोटा देण्यात आला आहे ही माहिती खोटी आहे. पालिकेकडून अशा कोणत्याही कोट्याची तरतूद करण्यात आलेली नाही.
-विश्वास शंकरवार, पालिका उपायुक्त, परिमंडळ-७
पालिकेचा स्टाफ तैनात करणार
'ऑफलाइन कूपनच्या बाबतीत आम्हाला तेरापंत केंद्राकडूनही अशाच तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार आम्ही पालिकेचा स्टाफ त्याठिकाणी बसवला. आता वॉर्ड क्रमांक २६मध्येदेखील आमच्या अधिकाऱ्याला आम्ही तैनात करून लसीकरण शिस्तबद्ध पद्धतीने करणार आहोत.
- संजय कुऱ्हाडे, पालिका उपायुक्त, आरोग्य विभाग
केंद्रात भोंगळ कारभार सुरू
'संतमंत आश्रममध्ये स्थानिकांना दिवसभर उभे करून कूपन न देता परत पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. याठिकाणी भोंगळ कारभार सुरू असून, पालिकेने स्वतःच्या स्टाफकडे याची जबाबदारी देणे गरजेचे आहे.
- प्रकाश सुर्वे, आमदार, मागाठाणे
आम्ही सर्वांचेच लसीकरण करतो !
'तुम्हाला ही माहिती कोणी दिली? यामध्ये काहीच तथ्य नाही. पूर्वी आमच्याकडे एकच लॅपटॉप असल्याने माझा मुलगा मयूर पंडागळे हा मोबाइलवर बुकिंग घेऊन ज्या दोन मुली आमच्याकडे काम करतात त्यांना पुढची प्रक्रिया करायला सांगायचो. मात्र आता ज्या डॉक्टर सेंटरवर आल्या आहेत त्यांच्याकडे दोन लॅपटॉप आहेत त्यामुळे आम्ही आता त्यावर बुकिंग करतो. तसेच कधी आमदार किंवा खासदारांकडूनही आम्हाला एखाद दुसऱ्याचे लसीकरण करावे लागते. मात्र आम्ही सर्वांचेच लसीकरण करत आहोत.
- प्रीतम पंडागळे , नगरसेविका, वॉर्ड-२६