अरे बापरे, कट ऑफ वाढला! अकरावी प्रवेश प्रक्रिया : नामवंत कॉलेजांमध्ये प्रवेशाचे टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:32 AM2024-07-23T06:32:13+5:302024-07-23T06:32:29+5:30

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

Oh dear, the cut off has increased! 11th Admission Process : Admission tension in reputed colleges | अरे बापरे, कट ऑफ वाढला! अकरावी प्रवेश प्रक्रिया : नामवंत कॉलेजांमध्ये प्रवेशाचे टेन्शन

अरे बापरे, कट ऑफ वाढला! अकरावी प्रवेश प्रक्रिया : नामवंत कॉलेजांमध्ये प्रवेशाचे टेन्शन

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्यांनंतर तिसऱ्या फेरीत महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये जवळपास सहा टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेशाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या अंतर्गत एकूण ५३ हजार ५४ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत प्रवेश अलॉट करण्यात आले आहेत. यामध्ये १५ हजार ८१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, ८ हजार ४३३ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि ७ हजार ३३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. 

कोणत्या महाविद्यालयांकडे कल 
आपल्याला तिसऱ्या फेरीत तरी पसंतीचे महाविद्यालय मिळेल, अशी अनेक विद्यार्थ्यांची अपेक्षा होती; मात्र तिसऱ्या फेरीत अनेक नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ ५ ते ६ टक्क्यांनी वाढल्याने अनेकांची निराशा झाली. एचआर महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कट ऑफ ५ टक्क्यांनी, सेंट झेव्हिर्सचा कला शाखेचा कट ऑफ ५ टक्क्यांनी, तर विज्ञान शाखेचा कट ऑफ ३ टक्क्यांनी वाढला आहे. मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाचा कला शाखेचा कट ऑफ ६ टक्क्यांनी, तर विज्ञान शाखेचा कट ऑफ ४ टक्क्यांनी वाढला आहे. 

माटुंग्याच्या रुईया महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असल्याने कला शाखेचा कट ऑफ २ टक्क्यांनी तर विज्ञान शाखेचा कट ऑफ ३ टक्क्यांनी वाढला आहे. 

२४ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती 
महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलैला सायंकाळी ६पर्यंत प्रवेश घेता येईल. कोट्यातील प्रवेशही २४ जुलैला सायंकाळी ६पर्यंत निश्चित केले जातील. मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा नसल्यास पुढील फेरीसाठी थांबता येईल; मात्र विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.

Web Title: Oh dear, the cut off has increased! 11th Admission Process : Admission tension in reputed colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.