अरे बापरे; एक महिन्याचे वीजबिल तब्बल १९ हजार; महावितरणाचा ग्राहकाला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:38 AM2020-08-28T01:38:25+5:302020-08-28T06:48:42+5:30
बिल बरोबर आहे; कसे ते सांगण्यास नकार
मुंबई : महावितरणच्या मुलंड येथील दोन वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आली असून, ही वीजबिले बरोबर असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र ही वीजबिले कशी बरोबर आहेत, हे मात्र सांगितले जात नाही, असे वीजग्राहकांचे म्हणणे आहे.
मुलुंड येथे वास्तव्यास असलेले विकास चौबळ हे वन रूम किचनच्या घरात राहत आहेत. विकास यांच्या घरी महावितरणची वीज आहे.
जून महिन्यांत १९ हजार ३१० रुपये एवढे बिल आले आहे. गेल्या महिन्यांच्या तुलनेत हे वीजबिल खूप आहे. याबाबत त्यांनी आॅनलाइन तक्रार दाखल केली आहे. महावितरण कंपनीने या ग्राहकांना संदेश धाडला असून, आपले वीजबिल बरोबर आहे, असे सांगितले आहे.
मात्र हे वीजबिल कसे बरोबर आहे, हे सांगितले नाही. मुलुंड येथेच सुषमा राजे राहत आहेत. त्यांच्या घरी महावितरणची वीज आहे. जून महिन्यांत त्यांना ८ हजार १० रुपये एवढे वीजबिल आले आहे. गेल्या महिन्यांच्या तुलनेत हे बिल कित्येक पटींनी जास्त आहे. याप्रकरणी त्यांनी आॅनलाइन तक्रार दाखल केली आहे. मात्र आपले वीजबिल बरोबर आहे, असे उत्तर त्यांना महावितरणकडून मिळत असून, वीजबिल कसे बरोबर आहे हे मात्र सांगितले जात नाही. वीजग्राहकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या कित्येक महिन्यांच्या तुलनेत हे वीजबिल खूप आहे.
काही रक्कम भरली
महत्त्वाचे म्हणजे वन रूम किचनमध्ये सर्वसाधारण विजेची जी उपकरणे वापरली जातात तीच आम्ही वापरली आहेत. परिणामी या वीज उपकरणांच्या तुलनेत हे वीजबिल खूप आहे. दरम्यान, आॅगस्ट महिन्यातही वीजबिलाने हाच कित्ता गिरवला असून काही रक्कम भरल्याचे ग्राहकाने सांगितले.