Join us

अरेच्चा ! लस न घेताच मिळाले प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोना लसीकरण घोटाळे उघड होत असतानाच एका तरुणाने लस न घेताच त्याला थेट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार ...

मुंबई : कोरोना लसीकरण घोटाळे उघड होत असतानाच एका तरुणाने लस न घेताच त्याला थेट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार चारकोपमध्ये शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी चारकोप पोलिसात लेखी तक्रार देण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत. नीलेश मिस्त्री (३३) असे या तक्रारदार तरुणाचे नाव आहे.

तो खासगी कंपनीत काम करत असून त्याला त्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यानुसार त्याने कोविन ॲपवर पहिल्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले. तेव्हा त्याला कांदिवलीतील डहाणूकर वाडीच्या चव्हाण रुग्णालयात स्लॉट मिळाला. मात्र काही कामात अडकल्याने मेस्त्री तिथे पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला तर थेट त्याचे प्रमाणपत्र तयार झाल्याचे त्याला समजले. मात्र लसच घेतली नाही तर प्रमाणपत्र कसे देण्यात आले याबाबत संशय व्यक्त करत त्याने मनसे विभाग प्रमुख दिनेश सळवींना घडला प्रकार सांगितला.

त्यानुसार साळवींनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत लेखी तक्रार चारकोप पोलिसांना दिली. 'आम्ही याप्रकरणी चौकशी करत असून हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत तपास करत असून गरज पडल्यास सायबर सेलचीही मदत यासाठी घेतली जाईल', असे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

फोटो ओळ: प्रमाणपत्र दाखवताना नीलेश मेस्त्री.