Join us

अरे येड्या, नाच-गाण्याच्या कार्यक्रमावरुन धनंजय मुंडेंवर फडणवीसांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 8:49 PM

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली.

ठळक मुद्देकाल-परवा एका मंत्र्याचं भाषण मी ऐकत होतो, तो मंत्री असं म्हणाला की आम्ही भाजपला मातीत गाडू, अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीतून उभी राहिली आहे

मुंबई - परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सपना चौधरी यांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाने अनेकांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमावरून आता धनंजय मुंडे यांच्यावर टीका होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर टीका केलीय. 

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना दिवाळी साजरी करता आली नाही. कित्येकांची घरे उध्वस्त झाली, पोरा-बाळांप्रमाणे सांभाळलेली गुरं-ढोरं डोळ्यादेखत वाहून गेली. त्याच मराठवाड्यातील बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे ऐन दिवाळीत डान्सर नाचवतायत. मंत्री मुंडेंकडून हीच अपेक्षा आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा समाचार घेतला आहे. भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी मुंडेंच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमावरही टीका केली. 

काल-परवा एका मंत्र्याचं भाषण मी ऐकत होतो, तो मंत्री असं म्हणाला की आम्ही भाजपला मातीत गाडू, अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या मुंबईच्या मातीतून उभी राहिली आहे. 2 वरुन 302 वर गेलेली ही पार्टी आहे. 4-6 खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये, असे म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना नाव न घेता प्रत्युत्तर दिलंय. तसेच, आम्हाला मातीत गाडून टाकणारे स्वत: गाडले गेले, पण आम्हाला गाडू शकले नाहीत. खरं तर कधी कधी मला आश्चर्य वाटतं. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे, अन् हे नाच-गाणं करण्यात मग्न आहेत आणि हे आम्हाला सांगतायंत, असे म्हणत फडणवीस यांनी धनंजय मुडेंना चांगलाच टोला लगावला. 

पाहा व्हिडिओ दरम्यान, परळीतील या कार्यक्रमाची आता महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. सोशल मीडियातून या कार्यक्रमाचे फोटोही व्हायरल होत आहेत.  तर, धनंजय मुंडे यांनी भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसधनंजय मुंडेपरळीभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस