तेल आणि तांदळाच्या दरात ५ ते १० रुपयांची दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:07 AM2021-01-04T04:07:03+5:302021-01-04T04:07:03+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठ्यात अडचणी आहेत. त्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत, तर तांदळाचे उत्पादन कमी आल्याने दरात ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेल पुरवठ्यात अडचणी आहेत. त्यामुळे तेलाचे दर वाढले आहेत, तर तांदळाचे उत्पादन कमी आल्याने दरात वाढ झाली आहे.
खाद्यतेलामध्ये सर्वाधिक मागणी ही सूर्यफूल तेलाला असते. म्हणजे ८० टक्के मागणी सूर्यफूल तेल तर २० टक्के इतर खाद्यतेल अशी स्थिती असते. सूर्यफूल, पाम आणि सोयाबिन तेल हे परदेशातून आयात केले जाते. पामतेल मलेशिया, सोयाबिन तेल अमेरिका, सूर्यफूल तेल रशिया, युक्रेन येथून आयात होते. पण यंदा वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तर तांदळाचेही यंदा उत्पादन कमी झाले आहे, त्यामुळे तांदूळ महाग झाला आहे. उत्पादन होत असलेल्या ठिकाणीच तांदळाचा तुटवडा आहे असे एका दुकानदाराने सांगितले.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. भाज्यांची आवक कमी होत असून भाज्या महागल्या आहेत. मेथी २५ , शेपू २५, लालमठ २०, चवळी २०, कोथिंबीर १० जुडी मिळत आहे. तर फरसबी ६०, वाल ८० रुपये किलो मिळत आहेत. शेवगा ८०, पडवळ, टोमॅटो, तोंडली ४०, मिरची ४० किलो दराने मिळत आहे. तर फळांच्या दरातही १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.
सफरचंद १५० रुपये, डाळिंब ११०, मोसंबी ६०, संत्री ७० प्रतिकिलो मिळते, तर केळी ४० डझन, किवी ४ नग १००, चिकू ५० रुपयांना मिळत आहेत. मोसंबी आणि संत्र्याच्या दरात मोठी घट होऊन दर निम्म्यावर आले आहेत.
किराणा मालात मूगडाळ ११० ते १२०, तूरडाळ ९० ते १५०, मसूर डाळ ७० ते ८०, चणाडाळ ६० ते ८० प्रतिकिलो दराने मिळत आहे. तर तेलाच्या दरात सूर्यफूल, शेंगदाणा आणि पामतेल १० रुपयांनी महागले आहे.
मुंबईत विविध ठिकाणाहून भाजीपाला येतो. या आठवड्यात भाज्यांची आवक कमी झाली आहे, त्यामुळे पालेभाज्या आणि इतर भाज्यांच्या दरात १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.
- श्वेता पवार, भाजी विक्रेता
आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. तर यंदा तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन घेणाऱ्या ठिकाणी तांदळाची कमतरता आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कोलम तांदळावर झाला आहे.
- राजेश शाह, व्यापारी
कधी भाजीपाला महाग होतो, तर किराणा स्वस्त. आता भाज्या आणि किराणा माल दोन्ही महाग झाले आहे.
तेल आणि तांदूळ आवश्यक आहेत. ते महागले आहे.
- दिपाली निकम, ग्राहक