तेल माफीयाला सफाळ्यात अटक
By admin | Published: September 24, 2014 12:20 AM2014-09-24T00:20:43+5:302014-09-24T00:20:43+5:30
आॅईल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सफाळ्यातील तेल माफीयासह त्याच्या काही साथीदारास सफाळे पोलीसांनी मंगळवारी पहाटे रंगेहाथ अटक केली
सफाळे : महामार्गावरून टँकरमधील डिझेल, आॅईल चोरून त्यांची विक्री करणाऱ्या सफाळ्यातील तेल माफीयासह त्याच्या काही साथीदारास सफाळे पोलीसांनी मंगळवारी पहाटे रंगेहाथ अटक केली. या समयी पोलीसांना आपल्या बचावासाठी गोळीबार करावा लागला.
मिथून राजेंद्र पाटील सफाळे कपासे मुख्य आरोपीसह शमीम अहमद अब्दुल अजिज अन्सारी रा. गोवंडी यांना सफाळे येथुन अटक केली आहे. तर असुल नथू सपकाळे रा. टेपाचापाडा, यशेष झगडे रा. रोडरवड, कालिया उर्फ विनोद आणि अनुप ही चार आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. मनोर परिसरातुन एका इनोव्हा गाडीतुन हे आरोपी ५५० लिटर डिझेल चोरून पळत होते. नाकाबंदी दरम्यान मनोरचे सहा. पोलीस निरिक्षक पाटील यांनी आरोपींना अडवायचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पाटील यांना उडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
हे आरोपी सफाळ्यातील राहणारे असल्याने ते महामार्गावरून सफाळे दिशेने येण्यास निघाले. याची खबर सफाळे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरिक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली. त्यांनी सफाळे परिसराला चारही बाजुंनी नाकाबंदी केली. सदर आरोपी सफाळे रेल्वे फाटकाजवळ आले असता पोलीसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्यांनाही गाडीने उडवून देण्याचा प्रयत्न केला. यात प्रसंगावधान राखून पाटील यांनी आरोपींना अडविण्यास हवेत गोळीबार केला. यावेळीही आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरले. सफाळे पोलीसांनी तब्बल तासभर त्यांचा पाठलाग करून अखेर टेभीखोडाळे परिसरातुन रंगेहाथ अटक केले. .