Join us  

विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:25 PM

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही महात्मा फुलेंच्या स्मृतींनी अभिवादन केले.   

मुंबई : मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावले जाणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज महात्मा फुले यांच्या 132 व्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील प्रवेश दालनात हे तैलचित्र लावण्यात आले आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही महात्मा फुलेंच्या स्मृतींनी अभिवादन केले.   

मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर शासनाच्या वतीने मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता झाली. चित्रकार राजेश सावंत यांनी हे तैलचित्र बनविले आहे. छगन भुजबळ यांनीही ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही ट्विट करुन हे फोटो शेअर केले आहेत.

फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशभरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाची कवाड खुली करून दिली.या आद्य समाज सुधारकांचे तैलचित्र मंत्रालयात इतर महापुरुषांच्या तैलचित्रा समवेत लावण्यात यावीत अशी  मागणी होती. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्यता देऊन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार आज महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेश दालनात फुले दाम्पत्यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :मुंबईमंत्रालयछगन भुजबळएकनाथ शिंदे