'आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव 3 टक्क्यांनी उतरले, तरी देशात 17 % वाढले'
By महेश गलांडे | Published: December 10, 2020 09:48 AM2020-12-10T09:48:20+5:302020-12-10T09:55:35+5:30
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यानं सणसणीत टोला लगावला होता. "देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा" असं म्हटलं आहे.
मुंबई - पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 28 आणि 29 पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर पुन्हा एकदा नव्वदी पार गेले आहेत. पेट्रोलचे दर 90 पार केल्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, विरोधकांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनसेच्या नेत्यानेही पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे.
देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यानं सणसणीत टोला लगावला होता. "देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करा" असं म्हटलं आहे. काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल दर : ९० रुपये, वास्तव किंमत : ३० रुपये, मोदी टॅक्स : ६० रुपये असं म्हणत देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून 'नरेंद्र मोदी वसुली केंद्र' करण्यात यावं" असं श्रीवत्स यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे राज्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनीही पेट्रोल दरवाढीवरुन सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
पेट्रोल, डिझेलचे सतत चढे दर ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मार्च ते डिसेंबर ह्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ३% नी भाव उतरले. मात्र देशात पेट्रोल १७% तर डिझेल १५% नी वाढलं. ह्यात सरकारी करांचा वाटा पेट्रोलला ६३% तर डिझेलला ५८.६% आहे. इतका बोजा नागरिकांवर का?
— Anil Shidore (@anilshidore) December 10, 2020
पेट्रोल, डिझेलचे सतत चढे दर ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मार्च ते डिसेंबर ह्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ३% नी भाव उतरले. मात्र देशात पेट्रोल १७% तर डिझेल १५% नी वाढलं. ह्यात सरकारी करांचा वाटा पेट्रोलला ६३% तर डिझेलला ५८.६% आहे. इतका बोजा नागरिकांवर का?, असा सवाल अनिल शिदोरे यांनी विचारला आहे. अनिल शिदोरे हे सातत्याने ट्विटवरुन आपली भूमिका मांडत असतात, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकांचं समर्थन केलं होतं. पण, पेट्रोल दरवाढीवरुन त्यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
एक गोष्ट खरी आहे की पेट्रोल/डिझेलवरचा टॅक्स वाढवला तर तो आपल्याच खजिन्यात जातो आणि नंतर सरकार त्याचा उपयोग आपल्यावरच करतं. परंतु त्यांचे भाव वाढल्यामुळे सर्वसाधारण महागाई होते. लोक खर्च कमी करतात, अर्थचक्राची गती मंदावते आणि अप्रत्यक्ष कर कमी गोळा होतो. म्हणून समतोल हवा.
— Anil Shidore (@anilshidore) December 10, 2020
सुब्रमण्यम स्वामींचाही भाजपला घरचा अहेर
भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पेट्रोलचे दर ४० रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्पष्ट गणितच मांडलं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली, पेट्रोलचे दर देशात ९० रुपये प्रति लिटर झाले असून ती देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचं स्वामींनी म्हटलंय. पेट्रोलच एक्स रिफायनरी मूळ किंमत ३० रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत ६०रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर ९० रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत ४० रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे, असेही स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.