Join us  

सलग पाचव्या वर्षी जुहू समुद्रकिनाऱ्यावर आले तेलकट टार बॉल्स, पुन्हा एकदा जेलिफिश किनाऱ्यावर

By मनोहर कुंभेजकर | Published: July 24, 2022 1:01 PM

चार दिवसांपूर्वी या ठिकाणी दिसले होते जेली फिश

मनोहर कुंभेजकर

मुंबई-आज सकाळी जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलकट टार बॉल्स आले आहेत. येथे टार बॉल येण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. चार दिवसांपूर्वी येथे जेली फिश आले होते.  विशेष म्हणजे येथे बुडण्याच्या घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाने जुहू बीच सकाळी ६ ते १० पर्यंत पर्यटकांसाठी खुला केला होता. मात्र आजपासून पूर्णपणे जुहू बीच पर्यटकांसाठी खुला केला असून आज मोठ्या प्रमाणात तेलकट टार बॉल आले आहे अशी माहिती सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे संस्थापक सुनील कनोजिया यांनी लोकमतला दिली. तसंच आज पुन्हा जेलिफिश आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पर्यटकांनी समुद्रात अनवाणी जावू नये असे आवाहन त्यांनी केले.

तर पालिका प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन येथील टारबॉल्स दूर करून समुद्रकिनारा स्वच्छ करावा अशी मागणी कनोजिया यांनी केली. तर येथे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यासाठी येथे जीवरक्षक तैनात असून पर्यटकांनी पाण्यात उतरू नका, अनवाणी जावू नये असे आवाहन ते करत आहेत.

दरवर्षी भरतीच्या लाटांमुळे असे टार बॉल्स मोठ्या प्रमाणावर जुहू आणि गिरगाव किनाऱ्यावर वाहून येतात. २०१९ मध्ये वर्सोवा आणि दादर समुद्रकिनाऱ्यांवर तसेच मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावरही टारबॉलची नोंद झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून मुंबई किनारपट्टीवर किनाऱ्यावर टारबॉलच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब आहे असे मत रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ.स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केले.

टार बॉल्स म्हणजे काय ?समुद्राच्या पृष्ठभागावर पसरलेले  क्रूड ऑइल लाटांमुळे घुसळले जाऊन तसेच पाण्यातील घटकांची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर या टार बॉल्समध्ये होते. पावसाळ्यात किनाऱ्याकडे ढकलले गेल्याने हे चिकट गोळे वाळूवर फेकले जातात आणि त्याचा थर वाळूवर जमा होतो. जेव्हा ते वाळू आणि कचरा यांत मिसळतात, तेव्हा त्यांना काढणे अत्यंत कठीण होते. जेव्हा क्रूड ऑइल समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगते तेव्हा त्याची भौतिक वैशिष्ट्ये बदलतात. गळतीच्या पहिल्या काही तासांमध्ये, तेल पातळ स्लीकमध्ये पसरते. वारा आणि लाटा यांच्यामुळे या ऑइल स्लिक खूप विस्तृत क्षेत्रात  विखुरलेल्या जातात.

विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक प्रक्रिया तेलाचे स्वरूप बदलतात. या प्रक्रियांना साधारणपणे "वेदरिंग" म्हणतात. सुरुवातीला या ऑइल स्लिक मधील हलक्या द्रव्यांचे बाष्पीभवन होऊन जाते. पण यातील जड द्रव्यांचे चॉकोलेट पुडिंगसारखे इमल्शन तयार होते. हे अतिशय घट्ट आणि चिकट असते. लाटा आणि वर यामुळे हे इमल्शन घुसळले जाऊन त्याचे लहान मोठे टार बॉल्स तयार होतात. असे टार बॉल्स  लवकर नष्ट होत नाहीत आणि ते कित्येक किलोमीटर वाहून नेले जातात. वाढत्या तापमानामुळे ते आणखी प्रवाही आणि चिकट बनत जातात. यातली हायड्रोकार्बन्समुळे त्वचेवर ऍलर्जी सारखी रिअॅक्शन येऊ शकते. समुद्रातील जलचर, पक्षी यांच्यासाठी हे टार बॉल्स खुच घटक ठरू शकतात. त्यामुळे अशी टार बॉल्सचे थर बसलेली वाळू गोळा करून घेण्याशिवाय काही पर्याय राहत, नाही अशी माहिती स्वप्नजा मोहिते यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :मुंबई