‘ओखी’चा तडाखा, मुंबईत पडला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 06:11 AM2017-12-05T06:11:05+5:302017-12-05T06:11:30+5:30

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या विपरीत परिणामामुळे सोमवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरावर मळभ दाटून आले.

'Okhi' hit, rain falling in Mumbai | ‘ओखी’चा तडाखा, मुंबईत पडला पाऊस

‘ओखी’चा तडाखा, मुंबईत पडला पाऊस

Next

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाच्या विपरीत परिणामामुळे सोमवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरावर मळभ दाटून आले. तर संध्याकाळच्या सुमारास वातावरणातील बदलांमुळे मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. नरिमन पॉइंट आणि कुलाब्यापासून दहिसर आणि ठाण्यापर्यंत पडलेल्या पावसामुळे ऐन हिवाळ्यात मुंबई भिजली.
ओखी चक्रीवादळाचा केरळ आणि तामिळनाडूला मोठा फटका बसला आहे. तेथे झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने गोव्यासह राज्याच्या किनाºयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाचा विपरीत परिणाम म्हणून सोमवारी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सकाळ वगळता दुपारनंतर दाटून आलेले मळभ अधिकच गडद झाले आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली. विशेषत: चक्रीवादळासंबंधीचे दिशाभूल करणारे संदेश सोशल नेटवर्क साइट्सहून पसरत असतानाच पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, मंगळवारसह बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या प्रदेशांमधील वातावरण ढगाळ राहील; शिवाय पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

समुद्रालगतच्या जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी!
मुंबईच्या किनाºयावर घोंगावणाºया ओखी वादळाच्या इशाºयानंतर मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी उशिरा जाहीर करण्यात आला.या जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि
विद्यापीठ सुरूच राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.

वादळाचा मोर्चा सुरतकडे!
‘ओखी’ चक्रीवादळाने मोर्चा गुजरातकडे वळविल्याने, मुंबईसह कोकण किनारपट्टीचा धोका कमी झाला आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे.
वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या १८३ खलाशी आणि मच्छीमारांची सुटका केल्याची माहिती, तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक के. आर. नौटियाल यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्रापासून ४५ सागरी मैलांवर घोंगावणाºया ‘ओखी’ने दिशा बदलली आहे. गुजरातच्या दिशेने वादळ घोंगावल्याने मुंबईवरील धोका टळला आहे. ताशी १०० मैल वेगाने वाहणारे वारे आणि ५ ते ६ मीटर उंचीच्या लाटांमुळे मच्छीमार व खलाशांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

मंगळवारीही पावसाची शक्यता
वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सायंकाळी पाऊस झाला. मंगळवारीही पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Web Title: 'Okhi' hit, rain falling in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई