Join us

ओला, उबर चालकांचा संप मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबतच्या बैठकीत तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 10:10 PM

12 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे

मुंबई: गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर ओला, उबर चालकांनी मागे घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर ओला, उबर चालकांनी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. ओला-उबर व्यवस्थापनाकडून असमाधानकारक व्यवसाय मिळत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू होता. 22 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ओला-उबर व्यवस्थापन आणि संघाचे प्रतिनिधी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. यामध्ये ओला-उबर व्यवस्थापनानं चालकांना प्रति किलोमीटर दरवाढीसह सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्या होत्या. यात कमिशन वजा न करता प्रति किलोमीटरमागील दरात वाढ करण्यात आली होती. शिवाय नव्याने लीज कॅब भाडेतत्त्वावर घेण्यात येणार नाही, रायडिंग टाइमसाठी प्रति किलोमीटर दीड रुपये देणे या आणि अशा अन्य मागण्या ओला-उबर व्यवस्थापनाने मान्य केल्या. मात्र याबद्दल लेखी आश्वासन मिळत नसल्यामुळे अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालकांनी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपात सुमारे ५० हजार अ‍ॅप बेस्ड टॅक्सी चालक-मालक सहभागी झाले होते. 22 ऑक्टोबरपासून हा संप सुरू होता. या प्रकरणी सरकारनं दोन दिवसात तोगडा न काढल्यास 5 नोव्हेंबरला लालबाग ते मंत्रालय पायी धडक मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा संघानं कालच दिला होता. 

टॅग्स :संपओलाउबरमुंबई