ओला, उबर कॅब चालक-मालकांचा संप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 06:59 PM2018-11-19T18:59:40+5:302018-11-19T19:02:19+5:30
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ओला, उबर कॅब चालक मालकांचा संप मागे घेण्यात आला आहे.
मुंबई - ओला, उबर कॅब चालक मालकांच्या सध्याच्या जवलंत प्रश्नावर लवकरच कंपन्यांचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाला आज विधान भवनामध्ये आज दिले. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी तो पर्यंत लढा स्थगित करण्याचे घोषित केले आहे.
ओला,उबरच्या चिघळलेल्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ ( इंटक )च्या वतीने लालबाग, भारतमाता सिनेमा येथून विधानभवनावर कॅब चालक, मालकांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. परंतु राज्यअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चावर मुंबई पोलीस खात्याने बंदी आणली. त्यानंतर ओला,उबर चालक मालकांनी तडक आझाद मैदान गाठले. मात्र तेथे ओला , उबर चालकांची प्रचंड सभा पार पडली या सभेच्या वतीने सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस गोविंदराव मोहिते ,सेक्रेटरी ,वाहतूक विभागाचे प्रमुख सुनिल बोरकर, ओला,उबरयुनिट प्रमुख प्रशांत सावर्डेकर (बंटी) ,आदींच्या शिष्टमंडळाने विधानभवनमध्ये मुख्यमंत्र्यानची भेट घेऊन निवेदन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सचिनभाऊ अहिर यांच्याशी बोलताना पुढे म्हणाले, कॅबचे चालक, मालकांच्या मेहतानामध्ये वाढ झाली पाहिजे, यासाठी ओला,उबर कंपनीला सध्याच्या दरात वाढ करण्याचे आदेश देण्यात येतील तरीही ते ऐकले तर वेगळा मार्ग चोखळण्यात येईल.या प्रश्नावर त्यांनी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा केली आहे.मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.त्या मुळे संघटनेचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांनी लढा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे.आजच्या आझाद मैदानावरील सभेत आमदार माजी मंत्री अमिन पटेल व नसिम खान यांनी भाषण करून आंदोलनाला पाठिंबा दिला.
ओला,उबरचा लढा 22 ऑक्टोबरपासून आज पर्यंत नेटाने चालू होता. बारा दिवस जवळपास चालक, मालकांनी बेमुदत संप करून आपली एकता दाखवली त्यामूळे हा संघटित शक्तीचा विजय आहे,असे गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, या लढ्यात आयटीएफ आणि संलग्न संस्था , तसेच दलित पँथर आदी संघटनानी जो पाठिंबा दिला त्या बद्द्ल त्यांचे गोविंदराव मोहिते यांनी आभार मानले आहेत.