मुंबईत घाटकोपरमध्ये ओला चालकानं ८ जणांना उडवलं, नेमकं काय घडलं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 04:07 PM2022-09-21T16:07:06+5:302022-09-21T16:07:41+5:30
Mumbai News: मुंबईतील घाटकोपर येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका ओला कॅब चालकानं बेदरकारपणे कार चालवत आठ जणांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका ओला कॅब चालकानं बेदरकारपणे कार चालवत आठ जणांना उडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. ओला चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
ओला चालकानं तीन रिक्षा, एक टेम्पो आणि दोन बाईकला धडक दिली. यात एकूण ८ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओला कॅब चालकानं अचानक कारचा वेग वाढवला आणि बेदरकारपणे कार चालवू लागला. यावेळी समोर जी जी वाहनं येत होती त्यांना धडक देत तो मुख्य हायवेच्या दिशेनं गेला. धडक दिली त्यावेळी रस्त्यावर विद्यार्थी देखील होते. पोलिसांनी ओला चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. झोन पाचचे उपायुक्त प्रशांत कदम हे स्वत: जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत. पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून जखमींची संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे.