‘ओला’ चालकांचा संप मागे; ‘उबर’बाबत आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:42 AM2018-03-22T01:42:54+5:302018-03-22T01:42:54+5:30
ओला कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ओला कंपनीविरुद्ध असलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उबर विरोधातील संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली.
मुंबई : ओला कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर ओला कंपनीविरुद्ध असलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, उबर विरोधातील संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक विभागाचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली.
ओला कंपनीने काळ्या यादीत टाकलेल्या चालकांना त्वरित सेवेत घेण्याचे मान्य केले आहे. उर्वरित मागण्यांसाठी १५ दिवसांची मुदतीत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन ओला कंपनीने दिल्याचे नाईक यांनी सांगितले. ‘महिन्याला लाखो रुपये कमवा’ अशी जाहिरातबाजी करणाऱ्या ओला-उबर अॅप बेस टॅक्सी कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ चालकांनी संप पुकारला होता. मुंबईसह राज्यातील ४० हजारांहून जास्त ओला-उबर चालक १९ मार्चपासून संपावर गेले होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यातच मंगळवारी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींनी रेलरोको केल्याने प्रवाशांच्या त्रासात भरच पडली होती.
संपासंदर्भात बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेत, अंधेरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह ओला कंपनीचे विधि सल्लागार, बिझनेस डेव्हलपर आणि सरचिटणीस आदिक शेख सहभागी होते.
या मागण्या मान्य
- काळ्या यादीतील कामगार त्वरित
सेवेत येणार
- कंपनीच्या लेटरहेडवर उर्वरित मागण्यांसाठी १५-२० दिवसांच्या मुदतीत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन
- ओला कंपनीसोबत होणारे करारनामे मराठी भाषेत
- ओला स्टिकरही मराठीत लावण्यात येणार
- ओला कार्यालयात जीवरक्षक नेमण्यात येणार नाही
- भागदारकांच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष योजना तयार करणार
- भागधारकांच्या समस्येसाठी योग्य व विशेष अधिकाºयांची ओला कार्यालयात नियुक्ती
पोलीस घेणार
आज बैठक
ओलाचा संप मागे घेण्यात आला आहे. उबरबाबत गुरुवारी दुपारी एक वाजता चिरागनगर पोलिसांनी बैठक बोलावली आहे. या वेळी उबरचे अधिकारी आणि मनसेचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतील चर्चेनंतर उबर संपाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- संजय नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक