मुंबई : ओला, उबर टॅक्सीची बुकिंग करून नंतर गाडीच्या चालकाला लुबाडून फरार होणा-या आणि प्रत्येक चोरीनंतर ‘माहीम दर्गा’मध्ये जाऊन चादर चढवणा-या चोराला रविवारी गोरेगाव पोलिसांनी अटक केली. शाहबान मोहम्मद शेख (२१) असे अटक चोराचे नाव आहे.शेख हा गोरेगाव पश्चिमच्या राम मंदिर रोड परिसरात राहतो. रविवारी त्याने गोरेगाव पश्चिममध्ये ओला कार बुक केली. शेखने दिलेल्या पत्त्यावर कारचालक पोहोचला. शेख त्या ठिकाणी आला आणि त्याने चालक बसलेल्या कारच्या खिडकीजवळ जाऊन त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता त्याने चालकाचे लक्ष बाहेरच्या दिशेने केंद्रित केले. चालकाने त्या दिशेने पाहताच शेखने त्याच्या कारमधील मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी चालकाने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासाअंती पोलिसांनी शेखला गोरेगाव परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीत तो अशाच प्रकारे आॅनलाइन कार बुक करून कारचालकांची लुबाडणूक करत असल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे चोरलेल्या वस्तू विकून त्यातून येणाºया पैशांतून तो माहीम दर्गामध्ये जाऊन चादर चढवायचा तर उरलेले पैसे मौजमस्ती करण्यात खर्च करायचा.
ओला, उबरची आॅनलाइन बुकिंग करून लूट! चोरीनंतर ‘माहीम दर्ग्यात’ चढवायचा चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:15 AM