मुंबई, दि. 19 - ओला आणि उबर चालकांच्या संघटनेने मुंबईत संपाचं हत्यार उपसले आहे. सोमवार ( 18 सप्टेंबर ) मध्यरात्रीपासून ओला-उबर चालक संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. अधिक उत्पन्न आणि सुरक्षित भवितव्यासाठी चालकांनी हा संप पुकारल्याची माहिती समोर आली आहे. संप तीव्र करण्याच्या उद्देशाने अनेक चालक राष्ट्रीय मिल मजदूर संघात सहभागी होण्याचीदेखील चिन्हं आहेत. संपामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, चालकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू, असं आश्वासन चालकांना देण्यात आले आहे. अधिक उत्पन्न आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
ओला, उबरच्या वेतनात ३३% कपात, कंपनीचा नफा वाढविण्यासाठी चालकांवर गंडांतरदरम्यान, ओला आणि उबर या बहुराष्ट्रीय टॅक्सी वाहतूक कंपन्यांनी खर्च आणि सबसिडीत मोठी कपात केल्यामुळे या कंपन्यांच्या चालकांच्या वेतनात गेल्या वर्षभरात तब्बल ३३ टक्क्यांची कपात झाली आहे. चालकांना मिळणा-या प्रोत्साहन लाभांतही (इन्सेंटिव्ह) ६० टक्क्यांची कपात झाली असून, त्यांच्या वाहनांचे हप्ते वगळून त्यांचे २०१७ च्या दुस-या तिमाहीतील मासिक उत्पन्न २१ हजारांपर्यंत खाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ते ३१ हजार ते ३२ हजार रुपये होते.
संशोधन संस्था रेड सिअरने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार चालकांना देण्यात येणा-या प्रोत्साहन लाभामुळे गेल्या काही वर्षांत ओला आणि उबर यांना झटपट टॅक्सी सेवा पुरविण्यात मोठे यश आले होते. तथापि, यावरील कंपन्यांचा खर्चही मोठा होता. आता चालकांच्या प्रोत्साहन लाभात ६० टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी आपले नफ्याचे प्रमाण वाढविल्यामुळे चालकांच्या लाभात घसरण झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, टॅक्सीचालकांकडून प्रचंड विरोध होत असतानाही ओला आणि उबर या कंपन्यांनी बंगळुरू आणि दिल्ली येथील टॅक्सी सेवा व्यवसायातील स्वत:चे नफ्याचे प्रमाण वाढविले आहे. त्याचा परिणाम म्हणून २०१७ च्या दुसºया तिमाहीत टॅक्सीचालकांना देण्यात येणा-या प्रोत्साहन लाभात मोठी कपात झाली आहे. चालकांच्या घरी घेऊन जायच्या (टेक होम) उत्पन्नात ३३ टक्के घट झाली आहे. देशातील चालकांचे सरासरी मासिक उत्पन्न २० हजार रुपये आहे. तथापि, ओला आणि उबरसाठी काम करणारे चालक ३० हजार ते ४० हजार रुपये कमावीत होते. प्रोत्साहन लाभामुळे अनेक चालक महिन्याला १ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नही कमावीत होते. तथापि, हे दिवस आता संपले आहेत. गाड्यांचे हप्ते थकलेउत्पन्न कमी होताच ओला आणि उबरसाठी काम करणा-या चालकांच्या वाहनांचे हप्ते थकू लागले आहेत. अनेक बँकांनी या कंपन्यांसाठी काम करणा-या चालकांना नवे कर्ज देणे बंद केले आहे.