जुना आग्रा रोड : १५ मिनिटांच्या प्रवासासाठी लागतात ४५ मिनिटे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:02 AM2020-01-09T02:02:15+5:302020-01-09T02:02:18+5:30

मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर म्हणजे जुन्या आग्रा रोडवरील शीतल सिग्नल ते घाटकोपर हा प्रवास करण्यासाठी सर्वसाधारणरीत्या १५ मिनिटे लागतात.

Old Agra Road: It takes 45 minutes to travel 15 minutes! | जुना आग्रा रोड : १५ मिनिटांच्या प्रवासासाठी लागतात ४५ मिनिटे!

जुना आग्रा रोड : १५ मिनिटांच्या प्रवासासाठी लागतात ४५ मिनिटे!

Next

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर म्हणजे जुन्या आग्रा रोडवरील शीतल सिग्नल ते घाटकोपर हा प्रवास करण्यासाठी सर्वसाधारणरीत्या १५ मिनिटे लागतात. मात्र सद्य:स्थितीमध्ये हा रस्ता विविध कामांसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मार्गावर ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या वाहनांचे पार्किंग केले जाते. परिणामी, रस्ता अधिकच अरुंद होतो. या सर्व घटकांमुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी पीक अवरला येथे होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे १५ मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ लागत असल्याचे चित्र आहे.
लाल बहादूर शास्त्री मार्ग जेथून सुरू होतो; म्हणजे सायन येथूनच या मार्गावर वाहनचालकांसह पादचारी वर्गास अडथळ्यांचा सामना करावा लागतो. येथे मोठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने आणि गोदामे आहेत. गॅरेजेसही आहेत. या सर्वांनी येथील फुटपाथ व्यापले आहे. यांचे अर्धेअधिक साहित्य फुटपाथवरच असते. परिणामी, पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ शिल्लक नसतो. रस्त्यांच्या कडेला यांची वाहने विशेषत: अवजडे वाहने सातत्याने अनधिकृतरीत्या उभी केली जातात. त्यावर कधीच कारवाई केली जात नाही. खासगी वाहनेदेखील अनधिकृतरीत्या उभी केली जातात. कुर्ला डेपो, कुर्ला डेपो सिग्नल, जुना आग्रा रोड बेस्ट बस स्टॉप, शीतल सिग्नल, कमानी सिग्नल, फिनिक्स मॉलसह घाटकोपरपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी वाहने अनधिकृतरीत्या उभी केली जातात. येथे ठिकठिकाणी विविध कामांसाठी रस्ता खोदण्यात आला आहे. अशा सर्व घटकांमुळे वाहतूककोंडी वाढते. या कोंडीमुळे प्रवाशांचा अर्धाअधिक वेळ वाया जातो. शीतल सिग्नल ते कमानी सिग्नलदरम्यान मायकल आणि होलीक्रॉस अशा दोन शाळा आहेत. या शाळांचे विद्यार्थीही याच मार्गाहून ये-जा करीत असतात. येथील वाहतूककोंडीचा, अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांचा, खोदकामांचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. येथे अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई केली तर अर्धे प्रश्न सुटतील. मात्र वाहतूक पोलीस, मुंबई महापालिका यांच्याकडून नाममात्र कारवाई होते.

Web Title: Old Agra Road: It takes 45 minutes to travel 15 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.