मुंबई : मनोरंजन क्षेत्रात जसजशी क्रांती होत गेली तसतशी चित्रपटगृह आणि नाट्यगृह बहरत गेली. आधुनिक सुविधांनी सज्ज अशी अनेक चित्रपटगृह मुंबईत आहेत. पण काही जुनी चित्रपटगृहे आजही तग धरून उभी आहेत. सामान्य वस्तीत असलेली आणि कमी किंमतीत तिकिटे उपलब्ध असलेली ही चित्रपटे आजही सामान्य प्रेक्षकांना आपल्याकडे खुणावत असतात. मल्टिप्लेक्समध्ये मिळणाऱ्या सुविधा या चित्रपटगृहांमध्ये मिळत नाहीत, मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा चित्रपट आलाय म्हटल्यावर रसिक प्रेक्षक या चित्रपटगृहांमध्ये आजही हजेरी लावतात.
मराठा मंदिर, मुंबई सेंट्रल
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट ज्या सिनेमागृहात अधिक काळ चालला ते सिनेमागृह म्हणजे मराठा मंदिर. मुंबई सेंट्रलच्या पूर्वेला असलेल्या या सिनेमागृहात अनेक चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होतो. दिलिप कुमार यांचा मुघल-ए-आझम हा चित्रपट या सिनेमागृहात थाटात झळकला होता. दिलिप कुमार यांनी या चित्रपटाच्या मार्केटिंगसाठी चक्क सिनेमागृहापर्यंत घोड्यावरुन सवारी केली होती, शिवाय चित्रपटगृहाच्या दाराशी हत्तींना उभं करण्यात आलं होतं. अशी कितीतरी हटके उदाहरण या सिनेमागृहाविषयी देण्यात येतील.
रॉयल टॉकिझ, ग्रॅण्ट रोड
१९१३ साली सुरू झालेले हे सिनेमागृह खरंतर १९११ पासूनच अस्तित्वात होतं. सुरुवातील केवळ शॉर्टफिल्म्स इकडे दाखवल्या जायच्या. त्यावेळेस ६०० प्रेक्षक एकावेळी चित्रपट पाहू शकत होते.
एडवॉर्ड थिएटर
१९१४ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे हे थिएटर आधी किंग एडवॉर्ड या नावाने ओळखलं जायचं. या चित्रपटगृहाची एक अशी आठवण सांगितली जाते की, १९७४ साली जेव्हा जय संतोषी मा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा तेथील स्त्रिया हा चित्रपट पहायला येताना चक्क देवीला ओवाळण्याची थाळी घेऊन जात असत. देवी चित्रपटात अवतरली की या महिला या थाळीने तिला ओवाळत असत. आता ही गोष्ट वाचताना फार हास्यास्पद वाटेल, मात्र त्यावेळी महिलांची यामागे फार मोठी श्रद्धा होती असं सांगण्यात येतंय. सध्या हे सिनेमागृह शेवटच्या घटका मोजत आहे. केवळ ४० ते ७० प्रेक्षक इकडे जुने चित्रपट पहायला येतात. या सिनेमागृहामध्ये जवळपास ३० कर्मचारी आहेत. सिनेमागृहाचे मेन्टेनस देऊन या कर्मचाऱ्यांचा पगार काढणे या चित्रपटगृहाच्या मालकाला आता फार अवघड जातंय.
न्यू रोशन टॉकीझ, ग्रॅण्ट रोड
ग्रॅण्ट रोड येथील दिल्ली दरबारच्या अगदी समोरच असलेला न्यू रोशन टॉकिझ १९३० सालापासून इकडे आहे. इक्बाल या इसमाने हा चित्रपटगृह विकत घेण्याआधी तिकिटविक्री केवळ १५ ते २० रुपये दराने होत होती. त्यानंतर इक्बाल या पारसी इसमाने हा चित्रपटगृह विकत घेतला आणि आताच्या पद्धतीने चित्रपटगृहाची बांधणी केली.त्यामुळे थोड्याफार प्रमाणात प्रेक्षक इकडे फिरकतात.
कॅपिटल सिनेमा, सीएसटी
सीएसटी स्थानकाच्या अगदी समोरच असलेला कॅपिटल सिनेमा हे १८७९ पासून लोकाचं मनोरंजन करतंय. या चित्रपटगृहात एक ब्रिटिश चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनेक ब्रिटिश चित्रपट इंग्रजांनी या चित्रपटगृहात चालवले. या चित्रपटगृहाची गेल्याकाही वर्षांपासून डागडुजी केली नसल्याने सिनेमागृह दुरवस्थेत आहे.
निशात सिनेमा, ग्रॅण्ट रोड
मुंबईतल्या मुख्य रेड एरियात वसलेला निशात सिनेमा हे सिनेमागृह निता पहलाज निहलानी यांच्या मालकीचा आहे. १५ ऑगस्ट १९५२ साली या चित्रपटगृहात पहिला चित्रपट दाखवण्यात आला. भोजपूरी सिनेमांसाठी हा चित्रपटगृह फार प्रसिद्ध आहे. सिनेमागृहाची सध्या डागडुजी करण्यात आली आहे, मात्र त्याआधी सगळ्या चित्रपटांसाठी इकडे १५ ते २० रुपये तिकिट आकारले जात होते.
इम्पेरिअल सिनेमा हॉल, ग्रॅण्ट रोड
सुरुवातीला ऑर्केस्ट्रासाठी सुरू झालेलं हे इम्पेरिअल सिनेमा हॉल आता भोजपूरी चित्रपटांसाठी फार प्रसिद्ध आहे. पांढऱ्याशुभ्र पिलर्स या सिनेमागृहाच्या अवतीभोवती असल्यानेच या चित्रपटगृहाला इम्पेरिअल असं नाव देण्यात आलं आहे. भोजपूरी चित्रपट अवघ्या २० ते ३० रुपयात दाखवून इकडचा मालक चांगले पैसे कमवतोय असं सांगण्यात येतं.
गुलशन थिएटर, ऑपेरा हाऊस
सगळ्यात कमी किंमतीत तिकिट मिळणारं चित्रपटगृह म्हणजे गुलशन थिएटर. आजही येथे तुम्हाला केवळ ९ ते १० रुपयात एखादा चित्रपट पहायला मिळू शकतो. कित्येक कॉलेजचे विद्यार्थी, जोडपे या चित्रपटगृहात कमी किंमतीचा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात.
भारतमाता सिनेमागृह, करीरोड
भायखळा, लालबाग, परळ विभागातील मराठी माणसांचा हक्काचा असेललं हे सिनेमागृहाची आता चांगलीच दुरवस्था झाली आहे. कित्येक वर्षांपासून या चित्रपटगृहाची डागडुजी व्हावी याकरता सगळ्यांनीच मागणी केलीय, मात्र आजतागायत काहीही झालेले नाही. आजूबाजूला अनेक मल्टिप्लेक्स उभे राहिल्याने भारतामाता आता मराठी माणसाच्या विस्मरणात जातंय. मात्र तरीही सगळीच मराठी चित्रपट इकडे दाखवली जातात, त्यामुळे थोड्याफार प्रमाणात हे चित्रपटगृह तग धरून उभं आहे.