पुरातन बॅण्ड स्टॅण्डला मिळणार नवा लूक
By admin | Published: January 2, 2017 04:10 AM2017-01-02T04:10:30+5:302017-01-02T04:10:30+5:30
पुरातन वास्तूपैकी एक असलेल्या कुपरेज उद्यानातील बॅण्ड स्टॅण्डला महापालिका लवकरच नवीन लूक देणार आहे. मात्र सागवानी लाकडाच्या
मुंबई : पुरातन वास्तूपैकी एक असलेल्या कुपरेज उद्यानातील बॅण्ड स्टॅण्डला महापालिका लवकरच नवीन लूक देणार आहे. मात्र सागवानी लाकडाच्या या वास्तूचे पुरातन महत्त्व कायम राहील याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
फोर्टमध्ये अनेक पुरातन वास्तू आहेत. यापैकीच एक असलेली ही वास्तू महापालिकेच्या मालकीची आहे. हे बॅण्ड स्टॅण्ड पूर्णपणे सागवानी लाकडाचे असून त्यावरील जोत्याचे बांधकाम बेसॉल्ट दगडाचे आहे.
बैठक व्यवस्था बीड धातूची आणि वास्तूवर मंगलोरी कौलाचे छप्पर आहे. मात्र ही वास्तू पूर्णपणे जीर्ण तसेच खराब झाल्यामुळे त्याचे नूतनीकरण करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
अशी बॅण्ड स्टॅण्डची दुरवस्था
अष्टकोनी कमानबद्ध वास्तू असलेल्या या बॅण्ड स्टॅण्डचे सागवानी लाकूड खराब झाले आहे. त्याचा पाया कमकुवत झाला आहे. त्यावर रंगरंगोटी केल्यामुळे त्याला विद्रूपता आली आहे. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी या वास्तूचे संरक्षण तसेच जतन करण्यात येईल. यासाठी जीर्णोद्धार कॉन्झव्हॅटर्स या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या दादर-नायगावमधील पुरंदरे स्टेडियम म्हणून ओळख असलेल्या मैदानाच्या जागेचाही विकास होणार आहे. त्या ठिकाणी नव्याने स्टेडियमची बांधणी करणार आहे.
पुरंदरे स्टेडियमची दुरवस्था झाल्यामुळे या मैदानाचा विकास करत त्या ठिकाणी स्टेडियमची बांधणी, सुशोभित प्रवेशद्वार, पदपथ, सुरक्षा भिंत व अन्य कामे केली जाणार आहेत. यासाठी सुमारे साडेनऊ कोटींचा खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)