मुंबई : जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पूनम नगर येथील पी.एम.जीपीच्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. परंतु, इमारती जीर्ण झाल्यामुळे पावसाळ्यात येथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत इमारतींची डागडुजी करण्यात यावी, अशी सूचना आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
जोगेश्वरीतील म्हाडाशी निगडित प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमदार रवींद्र वायकर यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या दालनात बैठक घेतली होती. या बैठकीला म्हाडाच्या स्लम बोर्डाचे सीईओ अधिकारी रवींद्र पाटील, म्हाडाच्या दुरूस्ती बोर्डाचे सीईओ अरुण डोंगरे, मुंबई बोर्डाच्या सह मुख्याधिकारी नीलिमा धायगुडे, कार्यकारी अभियंता हनमंत धनुरे, माजी नगरसेवक बाळा नर, तसेच पी.एम.जी.पी.चे रहिवासी उपस्थित होते.
ट्रान्झिट कॅम्प द्यावेतपूनम नगर येथील पी.एम.जी.पी.च्या १७ इमारती अति धोकादायक असून, यात सुमारे ९८२ सदनिकाधारक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या इमारतींची डागडुजी म्हाडाने तत्काळ करावी, अशी सूचना आमदार यांनी मांडताच म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी हे काम तत्काळ करावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.तसेच म्हाडाने ट्रान्झिट कॅम्प द्यावेत, पुनर्विकासासाठी टेंडर काढावे. प्रतिसाद मिळाला नाही तर, म्हाडानेचे या इमारतींचा पुनर्विकास करावा, अशी आग्रही भूमिकाही मांडण्यात आली.