Join us

जुन्या बसमध्ये सीसीटीव्ही नाहीत

By admin | Published: March 17, 2015 10:58 PM

ठाणे परिवहन सेवेत पाच वर्षापूर्वी दाखल झालेल्या २०० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तीन वर्षापूर्वी मंजूर झाला होता.

ठाणे : ठाणे परिवहन सेवेत पाच वर्षापूर्वी दाखल झालेल्या २०० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तीन वर्षापूर्वी मंजूर झाला होता. परंतु त्यांचे आयुर्मान संपण्यास दोन तीन वर्षाचा कालावधी असल्याने अन् कॅमेरे बसविण्याचा खर्च हा अडीच कोटींच्या घरात असल्याने टीएमटीने अखेर निर्णय बासनात गुंडाळला आहे. दुसरीकडे जुन्या १० वातानुकुलीत बसमध्ये एलसीडी टीव्ही मात्र बसविण्यात येणार आहेत. टीएमटीत पाच वर्षापूर्वी २०० बस दाखल झाल्या होत्या. त्यापैकी सद्यस्थितीला रस्त्यावर १५० बस रस्त्यावर धावत आहेत. त्यांचे आयुर्मान १० वर्षांचे असल्याने त्यातील ५० टक्के आयुर्मान पूर्ण झालेले आहे. त्यातही या बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला तरी निविदा मंजूर होऊन प्रत्यक्षात कॅमेरे बसविण्यापर्यंत आणखी एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो़ तसेच हे कॅमेरे बसविण्यासाठी येणारा खर्च हा २ कोटी १९ लाखांच्या घरात आहे. ही अतिशय खर्चीक बाब असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कॅमेऱ्यांबरोबर रेकॉर्डींग मॉडेल आणि मोबाइल बॅकअप डिव्हाईस देखील न बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. केवळ या बसचे आयुर्मान संपत येत असल्याने आणि कॅमेरे बसविण्यासाठी बसचे अंतर्गत पॅनेलिंग उघडावे लागणार आहे. प्रत्येक बसची अंतर्गत पॅनेलिंग उघडल्यास बसची स्टॅबीलिटी कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अखेर या जुन्या २०० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय परिवहनला बासणात गुंडाळावा लागला आहे. तर परिवहनमध्ये येत्या मे महिन्यापासून नव्याने दाखल होणाऱ्या २२० बसप्रमाणे या जुन्या बसमध्येही जीपीएस सीस्टम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे बस कुठे आहे, कोणत्या मार्गावर धावत आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच या २२० बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे बसविण्यात आले असून त्यानुसारच त्या परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोलींग करण्यासाठी कंट्रोल रुम तयार करणे, तसेच बसथाब्यांवर ४७० एलसीडी टीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी ३ कोटी २४ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित धरला असून त्यासंदर्भातील सुधारीत प्रस्ताव येत्या महासभेत मंजूरीसाठी पटलावर ठेवला आहे. या शिवाय जुन्या १० वातानुकुलीत बसमध्ये एलसीडी टीव्ही मात्र बसविण्यात येणार आहेत. यासाठी २ लाख ८० हजारांचा खर्च अपेक्षित धरला आहे. (प्रतिनिधी)४सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोलींग करण्यासाठी कंट्रोल रुम तयार करणे, तसेच बसथाब्यांवर ४७० एलसीडी टीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी ३ कोटी २४ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित धरला असून त्यासंदर्भातील सुधारीत प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.