Join us

नुकसानभरपाईचे जुने निकष बदलणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 2:54 AM

रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गास २५ कोटींची मदत

मुंबई : नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. निसर्ग चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपये देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली. ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे मात्र तेथीलही आढावा घेऊन मग निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. सरकार तुमच्यासोबत आहे. लवकरच मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाला भेट देईन. नागरिकांना विश्वासात घेऊन पंचनामे करा. मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडले असून तातडीने वीजपुरवठा सुरु करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.शाळांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामेचक्रीवादळामुळे बाधित झालेल्या रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यातील शाळांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची आॅनलाइन बैठक घेतली. यावेळी काही मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्याशीही संवाद साधत त्यांनी शाळांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :चक्रीवादळउद्धव ठाकरे