इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:04 AM2018-06-18T10:04:03+5:302018-06-18T10:06:54+5:30

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींनी इच्छामृत्यूची मागणी केल्याने खळबळ उडाली होती. मात्र वृद्धत्वाने खंगून मृत्यू येण्यापेक्षा धडधाकट असतानाच इच्छामरण स्वीकारण्याची परवानगी मागणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने अखेर आपला विचार बदलला आहे.

Old Couple just waiting for death | इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला!

इच्छामरण मागणाऱ्या आजी-आजोबांनी अखेर 'तो' विचार बदलला!

Next

मुंबई - काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने राष्ट्रपतींनी इच्छामृत्यूची मागणी केल्याने खळबळ उडाली होती. मात्र वृद्धत्वाने खंगून मृत्यू येण्यापेक्षा धडधाकट असतानाच इच्छामरण स्वीकारण्याची परवानगी मागणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने अखेर आपला विचार बदलला आहे. आता हत्या, आत्महत्या यांचा विचार न करता आपला मृत्यू नशीब आणि देवाच्या इच्छेवर सोडण्याचा निर्णय या आजी आजोबांनी घेतला आहे. 
मुंबईतील ठाकूरद्वार परिसरात राहणाऱ्या निवृत्त शिक्षिका इरावती लवाटे (78) आणि त्यांचे पती नारायण लवाटे (87) यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामृत्यूस परवानगी देण्याची मागणी केली होती. आम्ही दोघेही धडधाकट आहोत. आम्हाला काहीही आजार नाही. पण या वयात आम्हाला कुणावरही अवलंबून राहायचं नाही. आम्ही अवयव दान केलं असून जितक्या लवकर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी मिळेल तितकं ते आमच्यासाठी फायद्याचं ठरेल, असे सांगत त्यांनी इच्छामरण मागितले होते. तसेच परवानगी न दिल्यास मृत्यूला कवटाळण्यासाठी आत्महत्येसारख्या मार्गाचा स्वीकार करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. 
मात्र या आजी आजोबांचे मृत्यूबाबतचे मत आता बदलले आहे. मुंबई मिररने या संदर्भातील वृत्त प्रकाशिक केले आहे. ''आत्महत्येचा प्रयत्न केला तरी मृत्यू येईलच असे नाही. मृत्यूला कवटाळण्याच्या प्रयत्नात अपंगत्व आले तर अधिकच अडचण होऊ शकते. त्यामुळे मृत्यू येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चुकीचा पर्याय निवडण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला सन्माननीय मार्गाने मृत्यू हवा आहे. म्हणून प्रत्येक रात्री उद्याचा दिवस दिसू नये, अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करत असतो, असे इरावती लवाटे यांनी सांगितले. 
"जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नसतो याची जाणीव आम्हाला झाली आहे. त्यामुळे आमच्या जीवनाच्या अखेरीबाबत सारे काही देवाच्या भरवशावर सोडले आहे.कारण आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही," असे नारायण लवाटे म्हणाले. लवाटे दाम्पत्य दक्षिण मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये राहतं. या दाम्पत्याला मुलबाळ नाही,  तसेच कुठला गंभीर आजारही नाही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असे या दाम्पत्याला वाटते. त्यामुळेच त्यांनी इच्छामृत्यूची मागणी केली होती.

Web Title: Old Couple just waiting for death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.