जुन्या चित्रपटांच्या प्रिंट्सचे होणार जतन, ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:18 AM2023-11-07T11:18:14+5:302023-11-07T11:18:24+5:30
खराब होत चाललेल्या चित्रपटांचा ४ के, ३५ एमएम या आधुनिक स्वरुपात पुनर्संचय करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तऐवजीकरण आणि प्रतिबंधात्मक संवर्धन यांचा समावेश आहे.
मुंबई : जुन्या चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अंतर्गत जुने चित्रपट जतन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. खराब होत चाललेल्या चित्रपटांचा ४ के, ३५ एमएम या आधुनिक स्वरुपात पुनर्संचय करणे, चित्रपटाच्या प्रिंट्सचे डिजिटायझेशन, दस्तऐवजीकरण आणि प्रतिबंधात्मक संवर्धन यांचा समावेश आहे.
एनएफडीसी-एनएफएआयच्या पुणे कॅम्पस येथे हे कार्य करण्यात येते. जागतिक चित्रपट दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने जतन करून नव्या स्वरुपात आणलेल्या चित्रपटांचे कौतुक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी केले. दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त वहिदा रेहमान या चित्रपटांचे कौतुक करताना म्हणाल्या की, ‘गाईड’ चित्रपट नव्या स्वरूपात पाहताना मी चकीत झाले. माझ्या मुलीसोबत हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणे ही माझ्यासाठी विशेष पर्वणी होती. हे चित्रपट नव्या रुपात आणून नव्या पिढीला त्याचा आनंद घेण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले.
दिग्दर्शक-निर्माते गोविंद निहलानी यांनीही या मोहिमेचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आघात’ चित्रपट नव्या
रुपात पाहणे खूपच समाधानकारक होते.
आवाजाचा दर्जा, रंगसंगतीतील सुधारणा अतिशय दर्जेदार होत्या. एनएफडीसी-एनएफएआय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘आघात’ चित्रपट ३५ एमएम नव्या स्वरुपात आणल्याचा मला आनंद आहे.
दर्जेदार क्लासिक चित्रपटांचा पुनरसंचय आणि डिजिटायझेशन करणे हा या उपक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. सध्या अनेक जुन्या चित्रपटांच्या प्रिंट्स खराब झालेल्या अवस्थेत आहेत. वेळ, अयोग्यरीत्या स्टोरेज आणि विविध पर्यावरणीय घटकांचा परिणाम यांच्यामुळे हे चित्रपट कायमचे नष्ट होण्याचा धोका आहे. एनएफएचएम अंतर्गत चित्रपटाच्या या प्रती अत्यंत काळजीपूर्वकरीत्या पुनरुज्जीवित केल्या जातात, ज्यामुळे चित्रपटांची मूळ गुणवत्ता टिकून राहील.
- प्रीतुल कुमार, व्यवस्थापकीय संचालक, एनएफडीसी