राजापूर / जैतापूर : कपडे व पैसे यांच्या देवाणघेवाणीतून शरद विष्णू ठाकरे (वय ६०) यांचा निर्घृण खून झाल्याची घटना नाटे ठाकरेवाडी येथे घडली. याप्रकरणी नाटे पोलिसांनी शैलेश मधुकर ठाकरे (५०) याला ताब्यात घेण्यात आले आहे.शरद ठाकरे नाटे गावातील ठाकरेवाडीत एकटेच राहतात, तर त्यांचे कुटुंबीय मुंबईला राहतात, अशी माहिती नाटे पोलीस ठाण्याच्यावतीने देण्यात आली. शरद व त्यांचे शेजारी शैलेंद्र ठाकरे हे व्यसनी होते. त्यांच्यात पैसे व कपड्यांची देवाण-घेवाण होत असे. शिवाय खटकेही उडायचे. काही दिवसांपूर्वी शैलेंद्र ठाकरे यांनी पहाटे तीनच्या दरम्यान शरद ठाकरे यांच्या घरात प्रवेश केला व लाईट बंद करून त्यांचे कपडे, पॅनकार्ड, रेशनकार्ड अशा गोष्टी घेऊन पलायन केले. त्यातील पॅनकार्ड व रेशनकार्ड जाळून टाकले. याबाबतची पक्की खात्री झाल्याने शरद यांनी शैलेश याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतरही ते शिवीगाळ करत राहिले. त्याचा राग शैलेशच्या मनात होता. गुरुवारी (दि. २१ मे) सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शरद व शैलेश घरातून बाहेर पडले होते. शुक्रवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शरद यांचा मृतदेह सापडला.नाटे गावातील निर्मनुष्य भागात हा प्रकार घडला होता. ठाकरेवाडीतील राजेश भानुदास ठाकरे यांनी तो प्रकार पाहिला व ते धावत धावत वाडीत परतले आणि त्यांनी अनिल जनार्दन ठाकरे (३६) यांना शरदकाका मळ्यात पडले असल्याची माहिती दिली. त्यानंतर वाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता शरद ठाकरे हे मृतावस्थेत आढळले. अनिल ठाकरे यांनी नाटे पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. नाटे पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व मिळालेल्या माहितीच्या आधारे शैलेश ठाकरे याला ताब्यात घेतले. शरदचा मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याच्या डोक्यावर वार झाला होता. तसेच शरीराच्या मागील व पुढील भागावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. या खूनप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. मयत शरदच्या मुंबईत असलेल्या कुटुंबाला याबाबतची कल्पना देण्यात आली. या खून प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बुरांडे करीत आहेत. (प्रतिनिधी)शैलेश गुन्हेगारी प्रवृत्तीचाशैलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याने त्याच्या पत्नीवरही काही वर्षांपूर्वी बाटलीने वार केले होते. तेव्हापासून पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली. शैलेश याला एक मुलगी आहे. मात्र, त्याच्या अशा वागण्यामुळे तीही तिच्या मैत्रिणीकडे मुंबईत राहते.
नाटेत वृद्धाचा निर्घृण खून, संशयित अटकेत
By admin | Published: May 23, 2015 12:04 AM