जुनं ते सोनं, पक्षांचा मूलमंत्र

By admin | Published: February 11, 2017 04:44 AM2017-02-11T04:44:59+5:302017-02-11T04:44:59+5:30

ऐनवेळी पक्षाने पत्ता साफ केल्यामुळे नाराज बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावणे काही नवीन राहिलेले नाही. विनवण्या व मिनतवारीनेही यापैकी काही जण मागे हटलेले नाहीत

Old to Gold, The Secret of Birds | जुनं ते सोनं, पक्षांचा मूलमंत्र

जुनं ते सोनं, पक्षांचा मूलमंत्र

Next

शेफाली परब-पंडित, मुंबई
ऐनवेळी पक्षाने पत्ता साफ केल्यामुळे नाराज बंडखोरांनी बंडाचे निशाण फडकावणे काही नवीन राहिलेले नाही. विनवण्या व मिनतवारीनेही यापैकी काही जण मागे हटलेले नाहीत. त्यामुळे अशा झारीतील शुक्राचार्यांना त्या-त्या राजकीय पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षाचा निर्णय अंतिम मानून आपल्या राजकीय कारकिर्दीवर पाणी सोडणारे निष्ठावान काही मोजकेच उरले आहेत. त्यांच्या या निष्ठा व सबुरीचे फळ अखेर त्यांना मिळाले आहे. त्यांच्या या स्वच्छ प्रतिमेचा फायदा उठवण्यासाठी असे काही मोहरे राजकीय पक्षांनी अशा अटीतटीच्या काळात मैदानात उतरवले आहेत.
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी असे सर्वच पक्ष मुंबई महापालिका २०१७ ची निवडणूक स्वतंत्र लढवत आहेत. याआधी शिवसेना व भाजपाची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असल्याने जागावाटपानुसार ठरलेले प्रभाग मित्रपक्षाकडे सोपवण्यात येत होते.
त्यामुळे पक्षाला आपल्या वाट्याला आलेल्या प्रभागातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वेळ अधिक मिळत होता. तसेच आव्हानही कमी होते. मात्र सर्वच पक्ष स्वबळावर असल्याने ही निवडणूक चुरशीची, अटीतटीची व राजकीय पक्षांचे भवितव्य ठरविणारी असणार आहे.
मोठ्या राजकीय पक्षांनी सर्वच जागांवर उमेदवार दिल्याने अनेक इच्छुकांनाही संधी मिळाली. मात्र प्रत्येक प्रभागात इच्छुकांची यादी मोठी असल्याने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र होतेच. मात्र इच्छुकांच्या या गर्दीत राजकीय पक्षांना आपल्या जुन्या-जाणत्यांची आठवण झाली. त्यामुळे पक्षाशी इमान राखून असलेल्या अशा निष्ठावानांचा वनवास अखेर संपला आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना मतदारांचा कौल मिळेल असा पक्षांना विश्वास आहे.

अखेर वनवास संपला
माजी आमदार, माजी महापौर आणि १५ ते २० वर्षे नगरसेवकपदाचा अनुभव असलेल्या जुन्या-जाणत्यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. आरक्षणामुळे बाद झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागात किंवा अन्य पक्षात न जाता पक्षाचे कार्य करणाऱ्या या कार्यकर्त्यांना अखेर लॉटरी लागली आहे.
शिवसेनेने महत्त्वाचे प्रभाग खेचून आणण्यासाठी अशा दिग्गजांना उतरवले आहे. यामध्ये दादर शिवाजी पार्कचा गड राखण्यासाठी मनसेच्या स्वप्ना देशपांडे यांच्याविरोधात विशाखा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राऊत या माजी महापौर व माजी आमदारही आहेत. दुसऱ्यांदा आमदारकीचे तिकीट त्यांना नाकारण्यात आल्याने त्या नाराज होत्या. तरीही पक्षातच राहून कार्य करीत राहिल्याने त्यांची पक्षाला आठवण झाली.
५२ वर्षांचे मिलिंद वैद्य माजी महापौर असून त्यांची कारकीर्द गाजली होती. १९९२ मध्ये नगरसेवक असलेले वैद्य अनेक वर्षे दुर्लक्षित होते. त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याचा फटका त्यांना बसला. शिवसेनेने माहीमचा गड मनसेकडून खेचून आणण्यासाठी वैद्य यांना उतरवले आहे.
तब्बल तीन वेळा बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषवणारे आशिष चेंबूरकर हे गेल्या निवडणुकीत आरक्षणामुळे बाद झाले. त्यांना या वेळेस वरळी आदर्शनगरमधून उमेदवारी मिळाली आहे.
सर्व आंदोलनांत आघाडीवर असणाऱ्या सेनेच्या राजूल पटेल १९९२ पासून गेली १५ वर्षे नगरसेवक होत्या. २०१२ मध्ये दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवली ज्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनाही पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.
भाजपाचे माजी गटनेते भालचंद्र शिरसाट यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली. घाटकोपर पंतनगरमधून ते निवडणूक लढवत आहेत. भाजपातील ते जुने नगरसेवक आहेत.
काँग्रेसचे माजी नगरसेवक व नऊ वर्षे बेस्ट समितीचे सदस्य असलेले १९९२ मधील नगरसेवक रवी राजा यांना अखेर या वेळेस तिकीट मिळाली आहे. त्यांचा प्रभाग २०१२ मध्ये इतर मागासवर्गासाठी आरक्षित झाला होता.
१९९२ पासूनचे शिवसेनेचे नगरसेवक व माजी महापौर महादेव देवळे यांना पक्षाने दिलेली उमेदवारी त्यांनी नाकारली, तर दहिसरच्या नगरसेविका व माजी महापौर शुभा राऊळ यांनीही माघार घेतली. त्या भाजपामध्ये जात असल्याची चर्चा त्यामुळे खोटी ठरली.

Web Title: Old to Gold, The Secret of Birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.